Pune rainwater drainage issue
पुणे : संध्याकाळ पासून सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांना चांगला दणका दिला आहे. संध्याकाळी वर्दळीच्या वेळी आलेल्या पावसाने वाहतूक कोंडीसह अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
शहरातील सिंहगड रस्त्यावरील नवीन ब्रीज ,वडगाव ब्रिज ते राजाराम ब्रिज,सिद्धेश्वर हॉटेल हडपसर ,खराडी बायपास, मित्र मंडळ चौक,इंदिरानगर या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.
शहर परिसरात अग्निशमन दलाकडे झाडपडीच्या 30 घटनांची नोंद झाली आहे. वारजे, चर्चनजीक व सातारा रस्ता, एसटी कॉलनीत पाणी साचल्याची नोंद तर धनकवडी, तीन हत्ती चौक येथे एक सीमाभिंत कोसळली आहे, धानोरीला होर्डिंग पडले आहे. या घटनांमध्ये जखमी कोणीही झाले नसून अग्निशमन दलाची वाहने व जवानांकडून कार्यवाही सुरु आहे.
आपल्या पुणे शहरातील सर्व नागरीकांनी एलर्ट रहावे. पुणे शहरात प्रचंड पाऊस चालु आहे. आपल्या बिल्डींग,सोसायटी आजुबाजुच्या परिसरात पावसाचे पाणी तुंबले आहे का? झाड पडले आहे का या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवावे. आपल्याला कसलीही मदत लागली तर आपण ११२ पोलिस ,१०१ अग्निशामक, आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक 02025501269,02025506800, 02067801500 या क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.