Pune Rain Update Pudhari
पुणे

Pune Rain Update: पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा! घाटमाथ्याला आज रेड अलर्ट; २४ जुलैनंतर पाऊस कमी होणार

पुणे घाटमाथ्याला अतिमुसळधारेचा शुक्रवारी रेड, तर शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस ताम्‍हिणी घाटात तब्बल २८० मि.मी. झाला, तर जिल्ह्यात १७ ते ३८ मि.मी. पावसाची नोंद झाली.

सायंकाळी पुणे शहर अन्‌ परिसराला जोरदार पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी झाडपडीसह घरांत, दुकानांत पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. पुणे घाटमाथ्याला अतिमुसळधारेचा शुक्रवारी रेड, तर शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

जिल्ह्यात गेले तीन ते चार दिवस सातत्याने पाऊस सुरूच आहे तो अजून थांबलेला नाही. गुरुवारी देखील जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. घाटमाथ्यावर सर्वत्र अतिवृष्टी झाली. तेथे सरासरी १०० ते २८० मि.मी. पेक्षा पाऊस झाला, तर जिल्ह्यात सरासरी ३० ते ३८, तर पुणे शहर आणि परिसरात १७ ते २० मि.मी. पावसाची नोंद झाली. बुधवारी रात्रीदेखील जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. गुरुवारी सकाळी पावसाने उघडीप दिली. मात्र, सायंकाळी पुन्हा जोरदार बरसला.

२४ जुलैपासून पाऊस होणार कमी

गत २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी, तर उर्वरित भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. कोकणातील ओझरखेडा ३३३, जव्हार २७०, तर ताम्हिणी घाटात २८० मि.मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

पुणे घाटमाथा वगळता उर्वरित भागातून मात्र २४ पासून पाऊस कमी होणार आहे. गुजरातमध्ये गुरुवारी पुराने थैमान घातले. मात्र, महाराष्ट्रात कोकण वगळता उर्वरित भागातून पाऊस कमी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT