नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील कुमशेत परिसरात सोमवारी (दि. २२) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अर्धा तास झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे शेतपिकांसह घरांचे मोठ्या नुकसान झाले. अवघ्या अर्ध्या तासात कोसळलेल्या पावसामुळे परिसरातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत होते. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कुमशेत, व तेथील ठाकरवाडी व पांगरीमाथा परिसरात या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरले. ठाकर समाजातील नागरिकांनी इंधनासाठी गोळा करून ठेवलेली लाकडेही पावसाच्या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे स्थानिक आदिवासी कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात प्रामुख्याने टोमॅटो, मका, ऊस तसेच विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येते.
अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटल्याने सुपीक माती वाहून गेली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकत्याच लागवड केलेल्या पिकांनाही या पावसाचा फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करून कृषी व महसूल विभागाने पंचनामे करावेत, तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व ठाकर आदिवासी कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या अनपेक्षित पावसामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिक चिंतेत असून प्रशासनाने त्वरित मदतीचे पाऊल उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.