पुणे: बहुप्रतीक्षित पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉड्युलिंगच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या दिशेकडील मालधक्का येथे यार्ड रिमॉड्युलिंगचा भाग असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स इंटरलॉकिंग इमारतीचे काम सुरू झाले आहे. हे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेच्या पुणे विभागाचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून कामे सुरू आहेत.
पुणे रेल्वे स्थानकावरील ताण प्रचंड वाढला आहे. येथून दोनशेपेक्षा अधिक रेल्वेगाड्यांची दररोज ये-जा असते. त्याद्वारे हजारो प्रवासी देशभरात प्रवास करतात. यामुळे पुणे रेल्वेस्थानक सातत्याने प्रवाशांसाठी अपुरे असल्याचे समोर येत आहे. सणासुदीच्या काळात तर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मसुद्धा प्रवाशांसाठी अपुरे पडत आहेत.
या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकाचा यार्ड भाग असलेल्या मालधक्का परिसरात रिमॉड्युलिंग करण्याचे नियोजन केले. येथे नवीन प्लॅटफॉर्मसह प्रवाशांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्याचे नियोजन केले आहे. या कामामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण काही प्रमाणात का होईना कमी होणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
रिमॉड्युलिंगच्या प्लॅनचा अभ्यास
रेल्वेच्या बांधकाम विभागासह आरएलडीए, ऑपरेटिंग, विद्युतीकरण, सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशन, इंजिनिअर (रेल्वे ट्रॅक सिस्टिम), सीएनडब्लू, ईटीएल (इलेक्ट्रिकल ट्रेन लायटिंग), लोको, आरपीएफ, कमर्शिअल व अन्य सर्व विभागांकडून पुणे यार्ड रिमॉड्युलिंगच्या प्लॅनचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानंतरच येथील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे.
...ही कामे होणार
पुणे स्थानकाचे प्लॅटफॉर्म वाढणार
सर्व प्लॅटफॉर्मवर लांब गाड्या उभ्या राहणार
पॉइंट्स आणि क्रॉसिंगची कामे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होणार
रेल्वेलाइनचे अलाइंमेंट होणार
पुणे स्थानकादरम्यान असणार्या सिग्नल यंत्रणेचे अत्याधुनिक पद्धतीने काम होणार
रेल्वेयार्डातील केबलिंगचे काम होणार
यार्डची कामे झाल्यावर हा फायदा होणार...
प्लॅटफॉर्म लांबी वाढल्याने जास्त डब्याच्या गाड्या पुणे स्थानकावर थांबणार.
जास्तीत जास्त प्रवाशांची वाहतूक होणार.
सिग्नलिंगमुळे रेल्वेगाड्यांना तातडीने क्रॉसिंग करता येणार.
प्रवाशांचा वेळ वाचणार. ? प्रशस्त प्लॅटफॉर्मवर थांबता येणार.
पुणे रेल्वे स्थानक येथील यार्ड रिमॉड्युलिंगच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाचा भाग असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स इंटरलॉकिंग इमारतीचे काम सुरू झाले आहे. या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कामे सुरू केली जातील. जून 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे आमचे नियोजन आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.- रामपाल बडपग्गा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग