Pune Station Bus Station Pudhari
पुणे

Pune Railway Station Redevelopment: पुणे रेल्वेस्थानकाचा कायापालट; एसटी बसस्थानक जागेवर नवी इमारत उभारण्याची योजना

398 कोटींच्या प्रकल्पात हेरिटेज इमारत जतन करत आधुनिक ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्याचा आराखडा

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद जगताप

पुणे: पुणे रेल्वेस्थानकाचा कायापालट करण्यासाठी मध्य रेल्वे पुणे विभागाने कंबर कसली असून, आता स्थानकाच्या पुनर्विकासाने वेग घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पुणे रेल्वेस्थानकाची हेरिटेज (वारसा) इमारत जतन करून, पुणे स्टेशन येथील एसटी बसस्थानकाच्या जागेवर रेल्वेची नवी मुख्य इमारत आणि रोड ओव्हर बिज उभारण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पुणे रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारने 398 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राजेश कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनात चालू आर्थिक वर्षातच हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. याचाच एक भाग म्हणून मालधक्का परिसरातील जुन्या इमारती पाडण्यात आल्या असून, रेल्वे यार्डचे विस्तारीकरण आणि नवीन प्लॅटफॉर्मचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

एसटी बसस्थानकाच्या जागेची मागणी

रेल्वेस्थानकाची मूळ इमारत ही ऐतिहासिक वारसा असल्याने तिला कोणताही धक्का लावता येणार नाही. मात्र, प्रवाशांच्या वाढत्या संख्येसाठी आणि आधुनिक सुविधांसाठी मुख्य इमारत उभारण्यास रेल्वेला जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे पुणे स्टेशन समोरील एसटी बसस्थानकाची मोक्याची जागा रेल्वेला हस्तांतरित करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. या जागेवर पुणे रेल्वेस्थानकाची नवी प्रशासकीय इमारत आणि प्रस्तावित उड्डाणपुलाचा (आरओबी) काही भाग येणार आहे.

एसटीला दुसरी जागा अन्‌‍ नवीन बसस्थानकाचा पुनर्विकास

पुणे स्टेशन येथील बसस्थानकाची जागा रेल्वेला मिळाल्यावर त्या जागेच्या बदल्यात रेल्वे प्रशासन एसटीला मालधक्का परिसरात नवीन जागा देणार आहे. याशिवाय नव्याने दिलेल्या जागेत एसटी बसस्थानकाच्या प्रशासकीय इमारती, बस संचलन इमारती आणि अन्य सोयीसुविधा रेल्वे उभारून देणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दै. ‌‘पुढारी‌’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

पुढील आव्हाने काय?

रेल्वेने या जागेची मागणी केली असली तरी, एसटी प्रशासन आपली मोक्याची जागा रेल्वेच्या हवाली करणार का? आणि त्या बदल्यात एसटीला पर्यायी जागा किंवा मोबदला काय मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ही जागा मिळाल्यास पुणे रेल्वेस्थानक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित होण्याचा मार्ग मोकळा होईल, मात्र असे असले तरी एसटी प्रवाशांना रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी आणि रेल्वेस्थानकावरून एसटी बस स्थानकात जाण्यासाठी मोठा फेरा पडणार आहे. त्यामुळे याबाबत दोन्ही प्रशासनाने योग्य चर्चा करून आणि प्रवासी प्रतिनिधींची मते जाणून अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवासी तज्ज्ञांकडून केली जात आहे.

पुणे रेल्वेस्थानकाच्या पुनरविकासाचे नियोजन करताना जुन्या हेरिटेज इमारतीचे अस्तित्व जपण्यास आमचे प्राधान्य आहे. वारसा वास्तूला धक्का न लावता आधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आम्हाला जागेची आवश्यकता आहे. त्यासाठी एसटी प्रशासनाशी जागा हस्तांतरणाबाबत चर्चा सुरू आहे. ही जागा मिळाल्यास तिथे पुणे रेल्वेस्थानकाची नवीन मुख्य इमारत आणि रोड ओव्हर बिजचे काम करता येईल, त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होईल.
हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT