पुणे: अनधिकृतपणे पिण्याच्या पाण्याची (पाणी बाटली) विक्री करणाऱ्यांवर पुणे रेल्वे विभागाकडून विशेष मोहीम राबवून नुकतीच कारवाई करण्यात आली. या मोहिमेत पुणे रेल्वे स्थानकावर 1 हजार 284 रेलनीर व्यतिरिक्त दुसऱ्या बँडच्या विक्रीसाठी आणण्यात आलेल्या अनधिकृत पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
रेल्वे स्थानकावर अधिकृतपणे रेलनीर या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री केली जाते. त्यामुळे प्रवाशांनीही अधिकृत काउंटरवर बाटली/पाणी घ्यावे, असे आवाहन रेल्वे विभागाकडून प्रवाशांना वारंवार करण्यात येते. (Latest Pune News)
मात्र, काही फेरीवाले किंवा परवाना नसलेल्या विक्रेत्यांकडून अनधिकृत पॅकेज्ड पिण्याचे पाणी विक्री केली जाते. त्यामध्ये स्थानकाबरोबरच रेल्वे गाड्यांमध्ये हा प्रकार दिसून आला. त्यामुळे पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक अनिल कुमार पाठक यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक व्यावसायिक व्यवस्थापक शंतनू अत्रे यांच्या देखरेखीखाली एक विशेष मोहीम राबवली. त्यामध्ये पथकाने एकूण 107 बॉक्स जप्त केले.
तसेच रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) पुणे विभागाकडूनही कोपरगाव रेल्वे स्थानकावर अनधिकृत पाणी विक्रीविरुद्ध विशेष मोहीम राबवली. त्यामध्ये रेवा एक्सप्रेसच्या तपासणीदरम्यान जनरल डब्यातून अनधिकृत बँडच्या एकूण 40 बाटल्या तर ट्रेन क्रमांक 11017 मध्ये तपासणीदरम्यान 74 बाटल्या आढळून आल्या. त्यानुसार आरफीएफकडून कारवाई करण्यात आली आहे.