पुणे

पुणे : रेल्वे प्लॅटफॉर्मवर गुंडाराज ! फ्री स्टाईल हाणामारी

अमृता चौगुले

पुणे : घटना शुक्रवारची… सायंकाळचे साडेपाच वाजले होते… 'पुढारी'चे प्रतिनिधी पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे अधिकार्‍यांशी स्थानकाच्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले होते… चर्चा करीत असतानाच जोरदार अश्लील शिव्यांचा आवाज आला… गडबड कसली पाहतो तर काय..? स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी सुरू होती. ही हाणामारी एवढी भयानक होती, की ती पाहिल्यावर साऊथच्या एखाद्या अ‍ॅक्शन चित्रपटातील पात्रांनाही लाजवेल अशीच होती. या प्रकारामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हाणामारी करणार्‍या दोघांमधील एक जण दुसर्‍याला डोक्यापर्यंत उचलून-उचलून आपटत होता. आणि खाली पडणार्‍या व्यक्तीचे डोके आपटल्याचा जोरजोरात आवाज येत होता. ही घटना येथे घडणारी पहिली नसून, येथे अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचे तीन-तेरा वाजले असून, स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरच 'गुंडाराज' सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असून, प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षभरात पुणे पोलिसांनी शहरात 10 दहशतवाद्यांना पकडले आहे. पुणे शहर सध्या हाय अलर्टवर असताना, पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेकडे ढिम्म रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. सध्या पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा म्हणजे 'आओ जाओ घर तुम्हारा' अशीच झाली आहे. या रेल्वे स्थानकापेक्षा नव्याने शहरात तयार झालेल्या मेट्रो स्थानकाची सुरक्षा मजबूत असल्याचे दिसते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आगामी काळात घडणारी अनुचित घटना टाळण्यासाठी आत्ताच ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अन्यथा अनेक जिवांना आपले प्राण गमवावे लागणार आहेत.

सुरक्षा यंत्रणांचा 'क्विक रिस्पॉन्स' नाहीच

मागील दोन-तीन आठवड्यांपूर्वी अशीच घटना रेल्वे स्थानकावर स्टेशन डायरेक्टरच्या दालनाबाहेर घडली होती. त्यावेळी रेल्वे अधिकार्‍यांनी अनाउन्स करूनदेखील स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा वेळेवर आली नव्हती. शुक्रवारीसुद्धा अशीच घटना घडली. चित्रपटाप्रमाणे हाणामारी संपल्यावर बर्‍याच वेळाने सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी आली. प्रवाशांनी या वेळी जिवाची पर्वा न करता ही हाणामारी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती हाणामारी काही केल्या थांबली नाही. उलट हाणामारी करणार्‍या व्यक्तीने प्रवाशांनाच दमबाजी केली. त्यांच्यावर धावून गेला. मात्र, काही वेळाने सर्व प्रवाशांनी आणि रेल्वेच्या सफाई कर्मचार्‍यांनी हे वाद थांबविले. वाद थांबल्यानंतर प्रतिनिधीने लगेचच स्थानकाच्या सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. मात्र, या वेळी पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसल्याचे दिसले.

'स्कॅनर मशिन'अभावी बॅगा तपासणी बंद

प्रवाशांच्या बॅगा तपासण्यासाठी आवश्यक असलेले 'स्कॅनर मशिन' नव्हते. त्यामुळे कोण प्रवासी कोठून आला, त्याच्या बॅगेमधून काय घेऊन जातोय हे कसे कळणार, हा एक मोठा प्रश्न या वेळी उपस्थित झाला आहे. याबाबत आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) म्हणाले, पुणे रेल्वे स्थानक सर्व बाजूंनी खुले आहे. ते बंद करणे आवश्यक आहे. कोणीही कोणत्याही दरवाजातून आत येत आहे. आमच्याकडे मनुष्यबळसुद्धा कमी आहे. आम्ही कोणकोणत्या ठिकाणी लक्ष ठेवणार, या घटनेतील संबंधित व्यक्तींना पकडण्यात आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर अशा अनेक घटना घडल्या आहेत. प्लॅटफॉर्म 1 वर घडलेल्या या घटनेची माहिती आम्हाला मिळाली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.

– डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

हेही वाचा

SCROLL FOR NEXT