पुणे: जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र 1 लाख 87 हजार 695 हेक्टर इतके आहे. प्रत्यक्षात पिकांच्या पेरण्या सुमारे 1 लाख 33 हजार 607 हेक्टरवर म्हणजे सुमारे 71 टक्के क्षेत्रावर झालेल्या आहेत.
त्यामध्ये प्रमुख पीक असलेल्या ज्वारीचा पेरा 74 टक्के, गहू 66 टक्के आणि हरभऱ्याच्या 60 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.
जिल्ह्यात यंदा पाणीसाठे मुबलक आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह उन्हाळी हंगामातील पिकांसाठीही पोषक स्थिती राहण्याची अपेक्षा आहे. गहू आणि हरभरा पेरणीची सद्यस्थिती चांगली आहे. हरभऱ्याची पेरणी यापुढेही सुरू राहील. त्यामुळे अंतिम अहवालामध्ये पेरण्यांचा टक्का निश्चितपणे वाढण्याची अपेक्षा आहे.
तालुकानिहाय झालेली गव्हाची पेरणी हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हवेली 577, मुळशी 113, भोर 1226, मावळ 370, वेल्हे 110, जुन्नर 4125, खेड 960, आंबेगांव 1293, शिरूर 4310, बारामती 3274, इंदापूर 4013, दौंड 4330, पुरंदर 3254 हेक्टरवर गव्हाची पेरणी पूर्ण झालेली आहे. गव्हाप्रमाणेच हरभरा पेरणी क्षेत्रातही वाढ अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.