पुणे

तांत्रिकतेत हरवला विषयाचा गाभा! ‘पुरुषोत्तम’ला वाली न मिळाल्याने रंगकर्मी गंभीर; मान्यवरांनी दिला आत्मचिंतनाचा सल्ला

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अंतिम फेरीतील संघाचे सादरीकरण, दर्जा, विषयांची निवड, आशय, अभिनय, लिखाण आणि दिग्दर्शनात अनेक त्रुटी जाणवल्यामुळेच कठोर निर्णय घ्यावा लागला, असे निरीक्षण पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या परीक्षकांनी नोंदविले; तर विषय, आशय या एकांकिकेच्या आत्म्याकडे झालेल्या दुर्लक्षासह तंत्रज्ञानाद्वारे सादरीकरणातच विद्यार्थी गुंतून राहिल्याने एकही एकांकिका करंडकाची मानकरी ठरावी अशा दर्जाची झाली नाही, असे जाणकार रंगकर्मींनीही म्हटले आहे.

महाराष्ट्रीय कलोपासकच्या वतीने घेण्यात येणार्‍या पुरुषोतम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकाही महाविद्यालयाला करंडकावर नाव कोरता आले नाही. या निकालाबाबत परीक्षक आणि अंतिम फेरीतील संघातील कलाकारांनी आपापल्या बाजू मांडल्या आहेत.

हिमांशू स्मार्त (परीक्षक, अंतिम फेरी) : अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन या नाटकाच्या मूलभूत बाबींवरच फारसे काम झालेले दिसले नाही. मूळ गाभ्याचा अभ्यास न करता प्राथमिक बाबींना फाटा आणि निवडलेल्या विषयापासून रंगमचीय आविष्कारापर्यंत विद्यार्थ्यांमध्ये पुरेसे गांभीर्य जाणवले नाही. विषय निवडल्यानंतर जी 'खोदा-खोदी' (संशोधनात्मक अभ्यास) व्हायला हवी, त्यातून अनेक स्तरांवर बोध घ्यायला पाहिजे तो दिसला नाही. यातच तंत्रज्ञान एकांकिकेवर 'हावी' (वरचढ) होत असल्याचे दिसते. अभिनयामध्ये उथळपणा व चटपटीतपणा आला आहे. कुठलेही दीर्घकालीन काम दिसून आलेले नाही.

 योगेश सोमण (ज्येष्ठ रंगकर्मी) : परीक्षकांनी दिलेला निकाल हा योग्य आहे. कारण, गेल्या तीन ते चार वर्षांपासून एक प्रेक्षक आणि प्रशिक्षक म्हणून मला हा खालावलेला दर्जा जाणवत होता. त्यामुळे परीक्षकांचा निर्णय त्याला अनुसरून आहे. शेवटी ही एक चळवळ आहे, ती पुढे जाताना सकस पद्धतीनेच गेली पाहिजे, असा कटाक्ष हवा.

दुसर्‍या बाजूला, पहिला क्रमांक दिला, मग करंडक का नाही, दुसर्‍या, तिसर्‍या क्रमांकाचा करंडक कसा काय दिला, या प्रश्नांपासून यंदा एकांकिकांना दर्जाच नव्हता. निर्णय योग्यच आहे, या निकालाच्या समर्थनापर्यंत विविध प्रतिक्रिया पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थी कलाकारांच्या वर्तुळात उमटल्या.

प अन्वी बंकट (विद्यार्थिनी) : 'पीआयसीटी'ला प्रथम क्रमांक जाहीर केला आणि त्यांना करंडक दिला नाही. त्याच वेळी द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या एकांकिकांना करंडक दिला, हे पटले नाही. 'पीआयसीटी'प्रमाणेच अन्य संघांनाही केवळ रोख रकमेचे पारितोषिक दिले पाहिजे होते. तरीही निकालाशी मी सहमत आहे. मी स्वत: फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संघामार्फत यंदा एकांकिकेत सहभागी होते. आम्ही ज्येष्ठांच्या सूचनांवर काम करू.

'पीआयसीटी' संघाने 'कलिगमन' एकांकिकेसाठी प्रथम क्रमांकाचे सांघिक पारितोषिक पटकावले आहे. एकांकिकेची दिग्दर्शिका श्रुता भाटे म्हणाली, की परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असतो. तो मान्य केलाच पाहिजे. एकूणच एकांकिकेतील विषयात आणि मांडणीत खूप दम होता. आम्ही मेहनत करून एकांकिका सादर केली.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या (बारामती) 'भू – भू' एकांकिकेला दुसर्‍या क्रमांकाचा हरी विनायक करंडक मिळाला आहे. या एकांकिकेचा दिग्दर्शक सुबोधन जोशी म्हणाला, की स्पर्धेतील निकाल हा परीक्षकांचा अंतिम निर्णय असतो. त्याबद्दल आम्ही काहीच बोलू शकत नाही. आम्ही आमच्या परीने शंभर टक्के प्रयत्न केले.

…अन् एका वर्षात दोनदा स्पर्धा

कोरोनामुळे 2020 सालची पुरुषोत्तम करंडक स्पर्धा होऊ शकली नाही, तर 2021 ची स्पर्धा जानेवारी 2022 मध्ये झाली, तर लागलीच सहा महिन्यांनंतर 2022 सालची स्पर्धा घेण्यात आली. एकामागे एक स्पर्धा झाल्याने महाविद्यालयीन संघांना आणि कलाकारांना तयारी करता आली नाही, संघ तयारीत कमी पडले, असे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT