पुणे : पल्स पोलिओ लसीकरण मोहीम पुणे महापालिकेतर्फे येत्या रविवारी (दि. 12) राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे शहरातील शून्य ते पाच वयोगटातील सुमारे 3 लाख 12 हजार बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रदीपचंद्रन यांनी दिली. तसेच, 17 ऑक्टोबरदरम्यान गृहभेटीद्वारे राहिलेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येईल. बालकांना जवळच्या पोलिओ बूथवर जाऊन तोंडावाटे पोलिओचे दोन थेंब द्यावेत, असे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. (Pune Latest News)
या मोहिमेसाठी रविवारी 1 हजार 350 बूथ उभारण्यात येणार आहेत. हे बूथ अंगणवाडी, महापालिकेचे दवाखाने, मंदिरे आदी सार्वजनिक ठिकाणी उभारले जाणार आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही मोहीम सुरू राहील. प्रवासात असलेल्या बालकांना बसस्थानके, एसटी स्थानके, मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानके, विमानतळ आणि उद्याने येथे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच स्थलांतरित वस्त्या, वीटभट्ट्या आणि बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणीही पोलिओचा डोस देण्यात येईल.
नवजात बालकांना जन्मल्यानंतरही दिला जातो आणि त्यानंतर 45 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. पंचेचाळीस दिवस पूर्ण झाले नसले तरी त्या बालकांनाही हा अतिरिक्त डोस द्यावा. विशेषतः 13 सप्टेंबरनंतर जन्माला आलेल्या बालकांना हा डोस द्यावा. रविवारी 3 लाख 12 हजार 755 बालकांना पोलिओचे डोस दिले जाणार असून, पुढील पाच दिवसांत शहरातील सुमारे 10 लाख 40 हजार घरांना भेट देऊन ज्यांनी डोस घेतलेला नाही त्यांचे लसीकरण करण्यात येईल. -डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी