नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : कांदळी (ता. जुन्नर) येथील कुतळमळा परिसरातून बोअरवेलमधील वीजपंप व दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांच्या नारायणगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या. चोरट्यांकडून वीजपंप व दुचाकी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
मोहन अनिल माळी (वय १८) व विशाल अंकुश माळी (वय २०, दोघेही रा. श्रीरामपूर, अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. बोअरवेलमधील वीजपंप चोरीतील संशयित कांदळीच्या कुतळमळा येथील पोल्ट्री फार्म परिसरात फिरत असल्याची माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित मोहन व विशाल या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कुतळमळा परिसरातून बोअरवेलचा वीजपंप व दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात करुन दोघांनाही अटक केली.
ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक जगदेव पाटील, सनिल धनवे, पोलिस हवालदार दिपक साबळे, मोहरे, कोकणे, पोलिस नाईक मगन भुसावरे, मंगेश लोखंडे, वारे, पोलिस काॅन्स्टेबल दत्ता ढेंबरे, शैलेश वाघमारे, अक्षय नवले, गोरक्ष हासे, कोळी आदींच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस हवालदार मोहरे हे करत आहेत.