पुणे

pune porsche accident : आरोपींची रक्त तपासणी होणार ‘इन कॅमेरा’

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीसह त्याच्या दोन मित्रांचे रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर ससूनमधील आरोपींच्या तपासणीबाबत अनेक चर्चांना उधाण आले. यापुढे आरोपींचे रक्त नमुने घेणे, लेबल लावणे, सीलबंद करणे आणि पोलिसांच्या ताब्यात देणे ही प्रक्रिया 'इन कॅमेरा' करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. चौकशी समितीने याबाबतची शिफारस केली आहे. बिल्डरपुत्राच्या रक्ताचे नमुने सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत घेण्यात आले. तसेच, रजिस्टरमध्येही चुकीची नोंद करण्यात आली. पोलिस चौकशीत ही बाब समोर आल्याने डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोरला अटक करण्यात आली.

याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने कसून चौकशी केली. असे गंभीर प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी रक्त तपासणी 'ऑन रेकॉर्ड' घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी ड्रंक अँड ड्राइव्ह किंवा भांडण, अपघात या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची ससूनमध्ये तपासणी केली जाते. या आरोपीने मद्यपान केले की नाही हे पाहिले जाते. यासाठी आरोपीचा रक्ताचा नमुना घेतला जातो आणि त्यासोबत माहिती असलेला फॉर्म भरला जातो. रक्ताचा नमुना पोलिसांकडे सुपूर्त केला जातो. पोलिसांमार्फत रक्त नमुना औंधमधील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी जमा केला जातो.

या प्रक्रियेमध्ये कोणतीही फेरफार करू पाहणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कोणत्याही आरोपीला अटक केल्यावर प्रथम त्याला ससून रुग्णालयातील आपत्कालीन विभागात तपासणीसाठी दाखल केले जाते. आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांच्या देखरेखीखाली ड्युटीवरील डॉक्टर आरोपीच्या रक्ताचा नमुना घेतात. आरोपीने मद्यपान केले असल्यास त्याच्या स्थितीची माहितीही फॉर्मवर भरली जाते. रक्ताच्या नमुन्यासह फॉर्म पोलिसांकडे दिला जातो. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे न्यायालय आरोपीला शिक्षा सुनावते.

चौकशी समितीने केली शिफारस

आरोपींचे रक्त नमुने घेणे, लेबल लावणे, सीलबंद करणे आणि पोलिसांच्या ताब्यात देणे याचा असणार समावेश ससून रुग्णालयातच 90 टक्के आरोपींची तपासणी शहरातील 90 टक्के आरोपींना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून रुग्णालयात आणले जाते. उर्वरित आरोपी हे जिल्हा रुग्णालय, ग्रामीण भागातील आरोपी हे संबंधित ग्रामीण रुग्णालय येथे आणले जातात. औंध येथील जिल्हा रुग्णालयातही आरोपींची तपासणी होते, परंतु ते प्रमाण ससूनच्या तुलनेत अतिशय कमी आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT