राजगुरुनगर: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, खेड तालुक्यातील ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी (दि ८) रात्री पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली.
अजित पवार यांच्या गुरूवारच्या नियोजित दौऱ्यात संध्याकाळी उशिरा वराळे येथे शरद बुट्टे पाटील यांच्या निवासस्थानी भेट दाखवण्यात आली होती. परंतु अचानक ही भेट रद्द झालेनंतर पवार यांनी शरद बुट्टे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना आपल्या पुण्यातील निवासस्थानी बोलावून घेतले होते.
भामा खोऱ्यामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून बहुतेक विकास कामांना निधी मिळाला आणि आताही मिळतो आहे. परंतु राज्याच्या अर्थसंकल्पातून स्थानिक आमदार विरोधी पक्षाचा असल्याने निधी न मिळाल्यामुळे अनेक महत्त्वांच्या रस्त्याची कामे रखडली आहे ती मार्गी लागावीत अशी मागणी बुट्टे पाटील यांनी पवार यांच्याकडे केली.
मी काम करणारा असून विकास कामांना निधी देण्याचे अधिकार पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आहेत. अर्थमंत्री म्हणून राज्याच्या बजेट मधून देखील निधी देण्याचे काम माझ्याकडून होईल असे यावेळी शिष्ट मंडळाला पवार यांनी आश्वासित केल्याचे समजते.
शरद बुट्टे पाटील यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आणि पाईट - आंबेठाण जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार सुनीता बुट्टे पाटील, माजी सभापती चांगदेव शिवेकर, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ टेमगिरे, स्मार्ट व्हिलेज आंबेठाणचे सरपंच दत्ता मांडेकर व त्यांच्या पत्नी आंबेठाण पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार श्रद्धा मांडेकर, उद्योजक संदीपशेठ भोकसे व त्यांच्या पत्नी पाईट पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार धनश्री भोकसे यांच्यासह विविध गावचे सरपंच चेअरमन प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शरद बुट्टे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून येणारी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी. त्यांच्यासारखा अनुभवी आणि पंचायतराज क्षेत्रामध्ये अभ्यास असलेला आणि जनाधार असलेला कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असावा यासाठी प्रयत्न सुरू असताना त्यादृष्टीने कालची भेट महत्त्वाची मानली जाते.
शरद बुट्टे पाटील ११ वर्षानंतर पुन्हा स्वगृही ?
१९९९ मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून अजितदादा पवार यांच्याशी अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. पुणे पदवीधर विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रचंड तयारी केल्यानंतर देखील संधी न मिळाल्यामुळे बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती. पक्ष सोडताना देखील त्यांनी पवार यांचेशी प्रदीर्घ चर्चा केली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे नेते गिरीश बापट यांच्या माध्यमातून त्यांनी भाजपचे प्रवेश केला होता. जिल्हा परिषद पंचायत समिती गट आणि गण रचनेमध्ये देखील पवार यांनी शरद बुट्टे पाटील यांना सहकार्य केल्याची चर्चा आहे.
शरद बुट्टे पाटील भाजपाचे पदाधिकारी असले तरी विकास कामांमध्ये पवार यांनी गेले वर्षभरात त्यांना अनेक कामात सहकार्य केल्याचे दिसत होते. यातूनच बुट्टे पाटील पुन्हा पवार यांच्याकडे जातील अशा प्रकारच्या चर्चा होती. लोकसभा प्रचाराच्या निमित्ताने खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर शरद बुट्टे पाटील यांच्या भाम येथील जनसंपर्क कार्यालयाला देखील पवार यांनी भेट दिली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील शरद बुट्टे पाटील यांच्याशी आपले जवळचे संबंध असल्याचे जाहीर भाषणात पवार यांनी सांगितले होते.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचारामध्ये बुट्टे पाटील यांनी अनेक सभा गाजवल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आले आहेत. यातूनच आढळराव पाटील यांनी बुट्टे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस घेण्याच्या संदर्भामध्ये सुचित केले आहे. तर दिलीप मोहिते पाटील यांनी देखील बुट्टे पाटील यांना बरोबर घेण्यास होकार दिला असल्याचे समजते. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी २ दिवसापूर्वी कोरेगाव खुर्द, शिवे,वहागाव, गडद परिसरात दौरा करताना बाहेरच्या उमेदवाराला मदत करू नका, स्थानिक ,काम काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहन करून बुट्टे पाटील यांना मदत करण्याचे सूचित केले होते.