पुणे : विषारी औषध प्राशन करून एका पोलिस उपनिरीक्षकाने आपटे रस्त्यावरील एव्हरेस्ट हॉटेलमध्ये आत्महत्या केली. बुधवारी (दि. 7) दुपारी एक वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सुरज सुभाष मराठे (वय 30, रा. देहूरोड, आळंदी) असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी सुरज यांनी सुसाईड नोट लिहिली असून, त्यामध्ये कोणाला जबाबदार धरू नये. माझ्या वैयक्तिक ऑपरेशनच्या कारणातून आत्महत्या करीत आहे, असे नमूद केले आहे. सुरज हा गुडघ्याच्या विकाराने ग््रास्त होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले, अशी माहिती डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी दिली. याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज हा मुळचा देहूरोड-आळंदी येथील राहणारा आहे. 124 बॅचचा प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर तो पोलिस खात्यात पोलिस उपनिरीक्षक या पदावर रुजू झाला होता. प्रोबोशन कालावधी संपल्यानंतर त्याची नेमणूक सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलिस ठाण्यात झाली होती. दरम्यान, 30 डिसेंबर रोजी वैद्यकीय रजेवर सुटी घेऊन तो पुण्यात आला होता. आपटे रस्त्यावरील एव्हरेस्ट हॉटेलमध्ये तो थांबला होता, तर दुसरीकडे त्याचे नातेवाईक देखील त्याला शोधत होते. मंगळवारी दुपारी बारा वाजल्यापासून त्याचा फोन तो उचलत नव्हता.
सुरज पुण्यात येताना नातेवाइकाची गाडी घेऊन आला होता. त्या गाडीला जीपीएस ट्रॅकर होता. त्यामुळे गाडी आपटे रस्ता परिसरात असल्याचे आढळून आली. नातेवाइकाने सुरज थांबलेल्या हॉटलमध्ये चौकशी केली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना बोलावून त्याच्या खोलीचा दरवाजा वाजविला. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मास्टर चावीने खोली उघडली तेव्हा सुरज निपचित पडलेला दिसून आला. यानंतर डेक्कन पोलिसांना ही माहिती देण्यात आली. चौकशीत सुरजने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले.