पुणे, पुढारी वृत्तसेवा: वारजे माळवाडी परिसरात दहशत निर्माण करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अविनाश गुप्ता याच्यासह त्याच्या टोळीतील 14 जणांवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे.
टोळीप्रमुख अविनाश रामप्रसाद गुप्ता (वय 20, वेदगौरव सोसायटी, शिवणे), सागर भागवत वारकरी (वय 22, रा. राहुलनगर, शिवणे), अविनाश सुरेश शर्मा (वय 19, रा. रामनगर, वारजे), विकास सिब्बन गौड (वय 18, रा. राहुलनगर, शिवणे), आकाश सिब्बन गौड (वय 19), म्हम्या ऊर्फ संदीप नथुराम खैरे (वय 41, रा. रामनगर, वारजे) मेहबूब बाबू दफेदार (वय 19, रा. शिवणे) आणि 7 विधिसंघर्षित बालके, अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत. पोलिस आयुक्त गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षातील ही 40 वी व एकूण 103 वी कारवाई आहे.
अविनाश गुप्ता व त्याच्या साथीदारांविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, शस्त्र बाळगणेसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही त्यांनी वारंवार असे गुन्हे केले. त्यामुळे वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू हाके यांनी पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठविला. डहाळे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.
सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे पुढील तपास करीत आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू हाके, पोलिस निरीक्षक दत्ताराम बागवे, पोलिस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलिस अंमलदार सचिन कुदळे, अमोल भिसे, नितीन कातुर्डे, गोविंद कपाटे, प्रियंका कोल्हे यांनी केली.