Pune Alandi Rave Party raid
पुणे : तुषार झरेकर
आळंदी-तुळापूर रस्त्यावरील तुळापूर गावाच्या हद्दीतील एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत मद्यधुंद अवस्थेतील काही तरुणींसह अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून नशेसाठी वापरले जाणारे विविध पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तुळापूर गावाच्या हद्दीतील एका बंगल्यात मोठ्या आवाजात संगीत सुरू असून तेथे तरुण-तरुणींची पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी परिसराला वेढा घालून अनेकांना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान काही तरुणी मद्याच्या आणि अन्य अमली पदार्थांच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावरून नशेसाठी वापरले जाणारे संशयित पदार्थ, मद्याच्या बाटल्या तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले असून ते तपासासाठी पाठविण्यात आले आहे.
या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून संबंधित बंगला नेमका कोणाच्या मालकीचा आहे, पार्टीचे आयोजन कोणी केले होते आणि त्यामागे अमली पदार्थांचे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.