पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील रेस्टॉरंट बार, रुफटॉप हॉटेल आणि पबचालकांसाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली तयार केली आहे. नियमावलीचे पालन न करता अटी व शर्थीचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणार्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत कलम 144 नुसार आदेश काढण्यात आले आहेत. पंधरा दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही नियमावली लागू करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
शहरात मध्यरात्रीनंतर हॉटेल, तसेच पब सुरू ठेवण्यात येत असून, आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल आयुक्तांनी घेतली आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकांकडून नियमित तपासणी करण्यात येणार आहे. साऊंडचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त नसावा. रहिवासी भागातील पब, हॉटेलचालकांनी सामान्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे पोलिस आयु्क्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केल्यास पोलिस परवानगी घेणे गरजेचे आहे.
शहरात काही इमारतीतील छतांवर (रुफटॉप) हॉटेल सुरू करण्यात आले आहेत. तेथे बेकायदा मद्य विक्री केली जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. बेकायदा मद्य विक्री करणे गुन्हा आहे. हॉटेल, पबचालकांनी ग्राहकांच्या सुरक्षेसाठी अमलबजावणी करणे गरजेचे आहे. मध्यरात्री दीडपर्यंत व्यवसायास परवानगी आहे. रात्री दहानंतर मोठ्या आवाजात साऊंडचा वापर केल्यास कारवाई केली जाणार आहे. हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार किंवा डीजे येणार असल्यास त्याची माहिती देणे गरजेचे आहे. त्याची परवानगी पोलिसांकडून पंधरा दिवस अगोदर घ्यावी लागणार आहे. विदेशी कलाकार कधी येणार आहेत. कार्यक्रम संपवून ते कधी जाणार आहेत. त्यांच्या पासपोर्टच्या संदर्भातील सर्व माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे. एखादा इव्हेंट तुम्हाला शहरात आयोजित करायचा असेल, तर त्यासाठी दोन आठवडे अगोदर पोलिस आयुक्तालयातून परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी मिळाल्यानंतरच तुम्हाला कार्यक्रमाची तिकीट विक्री व प्रसिद्धी करता येणार आहे.
हॉटेलमध्ये काम करणारे बाऊन्सर, कर्मचारी यांची चारित्र्यपडताळणी (पोलिस व्हेरफिकेशन) करणे बंधनकारक आहेत. एखाद्या कर्मचार्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी संबंधित पोलिस उपायुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. अ?ेकदा बाऊन्सरकडून येणार्या ग्राहकांसोबत वादाचे प्रकार घडल्याची उदाहरणे आहेत. महिला ग्राहकांच्या सुरक्षेच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. महिला सुरक्षारक्षक तेथे तैनात करण्याच्या सूचना तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, बारमध्ये अठरा वर्षांखालील मुलांना मद्यविक्री करता येणार नाही. या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हॉटेलमध्ये धूम्रपानासाठी (स्मोकिंग झोन) असणे गरजेचे आहे. अन्य ठिकाणी धूम्रपान करता येणार नाही.
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हॉटेलमध्ये प्रवेश करणार्या मार्गावर, प्रसाधनगृह वगळून हॉटेलमधील सर्व भागांत तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहेत. सीसीटीव्ही चित्रीकरणातील रेकॉर्डिंग दोन डीव्हीआरमध्ये करावे लागणार आहे. पोलिसांनी एक डीव्हीआर यंत्र तपासणीसाठी नेले तर दुसर्यामध्ये ते चित्रीकरण साठवले जाईल.
हॉटेल, रेस्टॉरंट-बार आणि पबमध्ये सर्व प्रकारचे हुक्का आणि शिशा विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणीजर हुक्का विक्री करताना आढळून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
हेही वाचा