पुणे: कुख्यात नीलेश घायवळ, गजा मारणे, बंडू आंदेकर, टिपू पठाण यांच्या भोवतीचा कारवाईचा फास आणखीनच घट्ट करण्यासाठी पुणे पोलिसांनी पावले उचलली आहेत. त्यांचे आर्थिक व्यवहार थांबविणे, आत्तापर्यंत झालेल्या आर्थिंक व्यवहाराची तपासणी करणे, बेनामी संपत्तीची माहिती व या मध्ये मनी लाँड्रिंगचा प्रकार घडल्याचे निदर्शनास आल्याने आयकर, सक्त वसुली संचलनालयाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. सराईतांची दहशत मोडीत काढण्यासाठी हा कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. तसे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (दि. 30) झालेल्या बैठकीत दिले आहेत. (Latest Pune News)
सराईत टोळ्यांतील गुंडांची दहशत, भरदिवसा गोळीबार, खून, खुनाचा प्रयत्न, दहशतीसह दादागिरी, खंडणी उकळण्याचे सर्रास प्रकार शहरातील कुख्यात घायवळ, मारणे, आंदेकर, पठाण टोळीकडून केले जात होते. त्यापार्श्वभूमीवर संबंधित टोळ्यांना पोलिसांनी वठणीवर आणले आहे. त्यानंतरही त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे बारकाईने परीक्षण करावे, मोठ्या प्रमाणात झालेल्या व्यवहाराची माहिती आयकर विभागासह संबंधित विभागाकडे पाठवावी. जुन्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करावा. प्राप्त पुराव्यांच्या आधारे छोट्या गुन्हेगारांपासून टोळीप्रमुखापर्यंत आरोपींची कुंडली तपासण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचे कोट्यवधी रुपये अमोल लाखे याने स्वतःच्या संस्थेच्या नावाने फिरविले आहेत. त्यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यात पवनचक्की बसविण्यासाठी घायवळच्या दबावानेच लाखेच्या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्याच्या संस्थेच्या बँक खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार झाले आहेत.
याप्रकरणी आता खंडणी विरोधी पथकाकडून अमोल लाखे याच्या बँकखात्याचा तपशील अभ्यासला जात आहे. जामखेड परिसरात घायवळने 58 एकर जमीन खरेदी केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यानुसार आयकर विभागासह संबंधित यंत्रणेला माहिती दिली जाणार आहे. तर रूपेश मारणेच्याही मालमत्तेची चौकशी करून बेकायदेशीर मालमत्तेवर टाच आणली जाण्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
हँडलर शोधण्यास सुरुवात
गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्यासाठी अनेकांकडून अमुकतमुक भाईची दहशत, आपलीच हवा अशा स्वरूपाचे व्हीडिओ सोशल मीडियाद्वारे व्हायरल करीत दबदबा निर्माण केला जात आहे. गुन्हेगारांना उत्तेजन देणऱ्या सोशल मीडियावर ॲक्टीव्ह असलेल्याची लवकरच आयुक्तालयात शाळा भरविण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांकडून विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. कुख्यात मारणे, घायवळ, पठाण, आंदेकर टोळीच्या दहशतीचे व्हीडिओ ज्यांनी अपलोड केले आहेत, त्यांच्या मागेही चौकशीचा ससेमिरा लावण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारांचा फॅन फॉलोअर, व्हीडिओ व्हायरल करणारे ग््रुाप, अपलोड करणारे सोशल मीडिया हँडलर शोधण्यास पथकाने सुरुवात केली आहे. त्यानुसार कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.