पुणे: पोलिस ठाण्यांच्या निर्मितीनंतर आता शहरात नव्या पोलिस चौक्यांची उभारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत किमान तीन पोलिस चौक्या असाव्यात, यादृष्टीने पुणे पोलिसांनी नियोजन सुरू केले असून, त्यासाठीचा प्रस्ताव लवकरच गृह विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. विशेषतः नव्याने निर्माण झालेल्या पोलिस ठाण्यात या चौक्या होणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
सध्या शहरात सायबर पोलिस ठाण्यासह एकूण ४५ पोलिस ठाणी कार्यरत आहेत. मात्र, त्यातुलनेत पोलिस चौक्यांची संख्या अपुरी असल्याचे वरिष्ठ अधिकार्यांचे मत आहे. शहरात सध्या ११० पोलिस चौक्या असून, किमान १३५ पोलिस चौक्यांची आवश्यकता असल्याचे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे. नव्याने सुरू झालेल्या पाच पोलिस ठाण्यांपैकी दोन पोलिस ठाणी सध्या पोलिस चौकीच्या जागेतूनच कार्यरत आहेत. या उद्देशाने नवीन चौक्यांच्या स्थापनेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, तो लवकरच गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
बंद पडलेल्या पोलिस चौक्या पुन्हा कार्यान्वित
पुण्यासारख्या वेगाने विस्तारत असलेल्या महानगरात पोलिसांची स्थानिक पातळीवरील उपस्थिती वाढविण्यासाठी चौक्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याची गरज आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पुढाकारामुळे यापूर्वी विविध कारणांमुळे बंद पडलेल्या शहरातील सर्व पोलिस चौक्या पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
पोलिस आयुक्त यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने गेल्या वर्षी पुणे शहरासाठी पाच नव्या पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार मांजरी, लक्ष्मीनगर, नर्हे, लोहगाव आणि येवलेवाडी ही पाच नवीन पोलिस ठाणी कार्यान्वित करण्यात आली आहेत. या नव्या पोलिस ठाण्यांमुळे पुणे पोलिस दलाला वाढीव मनुष्यबळही उपलब्ध झाले आहे.
शहरात नव्याने काही पोलिस चौक्या स्थापन करणे आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच गृह विभागाकडे पाठविण्यात येणार असून, त्यास मंजुरी मिळेल, असा विश्वास आहे.अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर