Pune Police Arrest godwoman Vedika Pandharpurkar: एका आयटी इंजिनिअरला अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून तब्बल 14 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. ही फसवणूक कोणत्याही ऑनलाईन स्कॅमची नव्हे, तर स्वतःला ‘दैवी शक्ती असलेली साध्वी’ म्हणवणाऱ्या वेदिका पंढरपूरकर आणि तिच्या साथीदारांनी केल्याचं तपासात उघड झालं आहे.
पीडित दीपक डोळस हे पुण्यातील प्रसिद्ध आयटी इंजिनिअर असून, त्यांचं संपूर्ण कुटुंब अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलं. वेदिका पंढरपूरकरने “तुमच्या मुलींना ग्रहदोष आहे, त्याच निवारण करायचा असेल तर तुमचं धन आणि मालमत्ता माझ्या खात्यात ठेवा” असा सल्ला देत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. ती स्वतःला ‘शंकर महाराजांचा अवतार’ असल्याचं सांगत असे आणि घरात कथित पूजा-अर्चा करून वेदिका पंढरपूरकरने कुटुंबाचा विश्वास संपादन केला.
डोळस यांनी वेदिकाच्या सांगण्यावरून इंग्लंडमधील आपलं घर विकलं आणि त्यातून मिळालेला सगळा पैसा तिच्या खात्यात वर्ग केला. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या या कुटुंबाने आपली सर्व बचत आणि मालमत्ता विकून टाकली. आज हे कुटुंब पुण्यात भाड्याच्या घरात राहत आहे.
या प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये मुख्य आरोपी वेदिका पंढरपूरकर, तिचा पती कुणाल पंढरपूरकर, आणि भोंदू बाबा दीपक खडके यांचा समावेश आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई नाशिकमध्ये छापा टाकून केली असून आरोपींना पुढील चौकशीसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की, “डोळस कुटुंबाला अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून आरोपींनी त्यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात आणखी काही व्यक्ती सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपास सुरू आहे.”
या प्रकरणानंतर पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की, शिक्षित लोकही अंधश्रद्धेच्या जाळ्यात फसतात. पोलिसांनी सर्व नागरिकांना विनंती केली आहे की, अशा ‘दैवी उपचारां’च्या किंवा ‘ग्रहदोष शांतीच्या’ नावाखाली पैसे मागणाऱ्यांच्या संपर्कात आल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी.