पुणे

Pune PMPML Bus : ठेकेदारांच्या बसची आता कडक परीक्षा! ‘पीएमपी’चे इंजिनिअर करणार वर्कशॉपची तपासणी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या ठेकेदारांच्या बस यमदूत ठरत असून, सात महिन्यांत तब्बल 58 अपघात घडले आहेत. या अपघातांत सहा नागरिकांचे बळी गेले, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे वाढते अपघात रोखण्यासाठी आता पीएमपी प्रशासनाकडून ठेकेदारांच्या बस देखभाल-दुरुस्ती वर्कशॉपची दर महिन्याला कडक तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमपी इंजिनिअरचे पथक नेमण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पीएमपीच्या बसचे सातत्याने अपघात होत आहेत. अपघात झाला की प्रशासनाकडून तांत्रिक कारणे समोर केली जातात. रविवारी चतुःशृंगी व चांदणी चौकात बसला अपघात घडले. या पार्श्वभूमीवर दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने सोमवारी पीएमपीच्या अभियांत्रिकी विभागाला भेट देऊन बस देखभाल-दुरुस्तीच्या कामांची पाहणी केली.

दर 18 हजार किलोमीटरनंतर 'डॉकिंग'

बस अपघात रोखणे आणि ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून बस गाडीचे दर 18 हजार किलोमीटरनंतर 'डॉकिंग' केले जाते. डॉकिंग म्हणजे गाडीचे सर्व स्पेअरपार्ट वेगळे करून त्यांची तपासणी करून ते पुन्हा जोडले जातात. यात बसची चारही चाके, क्लच, ब्रेक, इंजिन व अन्य पार्ट काढून तपासणी केली जाते आणि ते पार्ट पुन्हा जोडले जातात. तसेच, दर दहा दिवसांनी प्रत्येक बस गाडीची देखभाल दुरुस्ती (सर्व्हिसिंग) केली जाते.

ठेकेदारांच्या बस दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह

पीएमपीच्या अभियांत्रिकी कार्यशाळेत प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सर्व साधने, सुविधा उपलब्ध आहेत. परिणामी, बस अपघात कमी होत असल्याचे समोर आले. परंतु, ठेकेदारांच्या बस देखभाल दुरुस्तीसाठी स्वत:ची कार्यशाळा आहे. त्यात या गाड्यांची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होते की नाही? याची पाहणी होत नाही. त्यातच सात महिन्यांत ठेकेदारांच्या बसला झालेले अपघात सर्वाधिक आहेत. त्यामुळे येथील दुरुस्तीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बस ठेकेदारांच्या असल्या, तरी त्या पीएमपीच्या नावाने शहरात धावतात. बस रस्त्यात बंद पडली. अपघातग्रस्त झाली तरी पीएमपी प्रशासनाकडेच बोट दाखविले जाते. त्यामुळे या बसचे अपघात रोखण्यासाठी ठेकेदारांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दर महिन्याला ठेकेदारांच्या कार्यशाळांना आमचे पथक भेट देऊन पाहणी करणार आहे.

– सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

हेही वाचा

SCROLL FOR NEXT