प्रसाद जगताप
पुणे : पुणे शहराची लोकसंख्या 40 लाखांच्याही पुढे आहे. यातील फक्त 5 लाख नागरिक शहरात दररोज पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.) बसचा वापर करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात पुण्यातील वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करायची असेल, तर 'पीएमपीएमएल' या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकट करून, तिचे रोजचे प्रवासी वाढविण्यावर भर द्यावा लागणार आहे.
एकेकाळी पुणे शहराची ओळख राहण्यायोग्य शहर म्हणून होती. मात्र, अलीकडच्या काळात ही ओळख वाढत्या प्रदूषणामुळे आणि वाहतूक कोंडीमुळे पुसली जात आहे. टॉम टॉम या जागतिक संस्थेच्या अहवालानुसार पुण्याचा वाहतूक कोंडीत सहावा क्रमांक लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने हे गांभीर्याने घेत, सार्वजनिक व्यवस्थेचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
तसेच, अमेरिका, जपान, रशिया यांसारख्या विकसित देशांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच मोठा वापर केला जात असल्याने तेथील रस्त्यांवर कोंडीचे प्रमाण कमी दिसत आहे आणि प्रदूषणही कमी आहे. त्यामुळे आपणही पुण्यातील कोंडी, प्रदूषण कमी करण्यावर भर द्यावा, अशी मागणी तज्ज्ञांकडून होत आहे.
असे आहे रोजचे उत्पन्न (रुपयांत)
पुणे शहर – 73 लाख 95 हजार 759
पिंपरी-चिंचवड – 9 लाख 56 हजार 748
पुणे व पिंपरी जिल्हा – 28 लाख 69 हजार 520
पीएमआरडीए भाग – 35 लाख 67 हजार 315
एकूण – 1 कोटी 47 लाख 89 हजार 342
असे आहेत रोजचे प्रवासी…
पुणे शहर – 5 लाख 25 हजार 568
पिंपरी-चिंचवड – 67 हजार 990
पुणे व पिंपरी जिल्हा – 2 लाख 3 हजार 918
पीएमआरडीए भाग – 2 लाख 53 हजार 506
एकूण रोजची प्रवासीसंख्या –
10 लाख 50 हजार 982
वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत असणे महत्त्वाचे आहे. पीएमपीने देखील पुणेकर प्रवाशांना आकर्षित करून प्रवाशांची संख्या वाढविण्यावर भर देणे आता गरजेचे आहे. प्रशासन पातळीवर याबाबत गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यायला हवेत.
– संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच