Pune Traffic Management Pudhari
पुणे

Pune Traffic Management: वाहतुकीला आता ‘रिअल टाइम डेटा’चा आधार; पुणे शहरातील वाहतुकीवर पालिकेची राहणार डिजिटल नजर

कोंडी, खड्डे अन् अपघातप्रवण ठिकाणांचे होणार विश्लेषण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी, अपघातप्रवण ठिकाणे आणि रस्त्यांच्या समस्यांवर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी पुणे महापालिका आता 'रिअल टाइम ट्रॅफिक डेटा'चा आधार घेणार आहे.

विविध यंत्रणांकडून उपलब्ध होणारी वाहतूक व प्रवासविषयक माहिती एकत्र करून त्याआधारे वाहतूक नियोजन, रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांबाबत निर्णय घेण्याचा प्रस्ताव पथ विभागाने तयार केला आहे.

यासाठी पुणे अर्बन मोबिलिटी सेल स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असून, तीन वर्षांसाठी सल्लागार म्हणून 'अर्न्स्ट अँड यंग एलएलपी'ची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी दरवर्षी दोन कोटी ३७ लाख रुपये (करविरहित) खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महापालिका आणि वाहतूक पोलिसांमध्ये समन्वय साधण्यासाठी ढोले रस्ता परिसरात एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन कक्ष उभारण्यात येणार आहे. येथे महापालिकेची सुमारे दहा जणांची टीम तसेच एससीएमटीआरची टीम कार्यरत राहणार आहे.

टॉमटॉम, दूरसंचार कंपन्या, सीसीटीव्ही, महाप्रीत, पुणे अर्बन ॲप, रोड मित्र, जीपीएस आधारित सार्वजनिक वाहतूक, वाहनतळ आणि नागरिक तक्रार निवारण प्रणालीतील माहिती एकत्रित केली जाणार आहे. तसेच आरएएमएस, जीआयएस, रस्ता बांधकाम व्यवस्थापन प्रणाली आणि ट्रेंचिंग पोर्टलचाही वापर केला जाणार आहे.

या माहितीच्या आधारे कोंडीची ठिकाणे, अडथळे व अपघातप्रवण क्षेत्रे निश्चित करून सिग्नल समन्वय, मार्ग नियोजन, वाहनतळ व्यवस्थापन, चौक पुनर्रचना, पदपथ, सायकल मार्ग आणि रस्ते दुरुस्तीला प्राधान्य देता येणार आहे. खड्डे, खोदकाम आणि कोंडी यांचा संबंधही तपासला जाणार असून, उपाययोजनांपूर्वी व नंतरचा परिणाम मोजला जाणार आहे.

'रिअल टाइम' डेटातून काय साध्य होणार?

विविध स्रोतांतील वाहतूक माहिती एकाच मंचावर येणार.

कोंडी व अपघातप्रवण क्षेत्रे अचूकपणे ओळखता येणार.

सिग्नल, मार्ग आणि वाहनतळ व्यवस्थापनात सुधारणा करता येणार.

खड्डे, खोदकाम आणि कोंडी यांचा परस्परसंबंध तपासता येणार.

रस्ते, चौक, पदपथ आणि सायकल मार्गांना प्राधान्य देता येणार.

उपाययोजनांचा परिणाम मोजता येणार.

वाहतूक नियोजन पूर्वानुमानाधारित करता येणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT