पिंपळगाव जोगा धरणाचा फुटलेला कालवा व झालेले नुकसान. (छायाचित्र : बापू रसाळे) 
पुणे

Pune canal breach : पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याला भगदाड, पाण्याच्या प्रचंड वेगाने पिके गेली वाहून!

शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान ; पाटबंधारे विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त, धना, टॉमॅटो, मिरचीसह शेतातील लाखमोलाची माती पाण्याबरोबर गेली वाहून

पुढारी वृत्तसेवा

ओतूर : जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याला धरणापासून दीड किलोमीटरच्या अंतरावर मंगळवारी (दि. १२) पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास मोठे भगदाड पडून कालवा फुटला. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले असून परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

कालवा फुटताच पाण्याचा प्रचंड वेगाने ओघ सुरू झाला आणि आसपासच्या शेतजमिनींमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेक शेतातील पिके पाण्याखाली जाऊन वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच शेतकरी संतोष निमसे यांनी तातडीने धरणावर धाव घेत कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर कालव्याचे पाणी बंद करण्यात यश आले. त्या वेळी कालव्यात सुमारे २६० क्युसेक वेगाने पाणी वाहत होते, अशी माहिती समोर आली आहे.

या घटनेत संतोष बबन निमसे व सुनील निमसे यांच्या सुमारे ५ एकर क्षेत्रातील धना, टोमॅटो, मिरची ही पिके तसेच सुपीक माती वाहून जाऊन अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेखर भाऊसाहेब हांडे यांच्या २ एकर ऊस पिकात पाणी साचले असून ३० गुंठे क्षेत्रातील काढणीस आलेली बाजरीही भुईसपाट झाली असून मोठे नुकसान झाले. याशिवाय शंकर सखाराम हांडे व त्यांच्या बंधूंच्या सुमारे ५ एकर क्षेत्रातील फुले व धना पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील सुमारे ३० एकर क्षेत्रात पाणी साचल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व स्थानिक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेची सखोल चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.

आमच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करून शेतजमीन पूर्वस्थितीत केल्याशिवाय पाणी सोडू देणार नाही, असा इशारा पंकज हांडे, जितेंद्र सस्ते, नवनाथ सुकाळे, राजेंद्र गाडगे, भगवान हांडे, सुनील निमसे, नितेश सस्ते, विशाल घाडगे, लहू शिरसाठ, नीलू हांडे, संदीप सस्ते आदी स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT