पुणे : कुत्र्याच्या मृत्यूप्रकरणी कल्याणीनगर भागातील एका पेटशाॅपच्या मालकासह तिघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वेटीक पेटशॉपचे मालक, कर्मचारी इस्माइल शेख, राज ऊर्फ प्रदीप दास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 28 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी वडगाव शेरी भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहायला आहे. तिने डॅश नावाचा कुत्रा पाळला होता. कल्याणीनगर भागात वेटीक पेटशॉप आहे. या पेटशॉपमध्ये कुत्र्यांची देखभाल, निगराणी राखली जाते. तरुणीने २८ सप्टेंबर रोजी आपल्या कुत्र्याला पेटशॉपमध्ये पाठविले होते. तरुणीच्या कुत्र्याला आंघोळ घातल्यानंतर त्याला उलटी झाली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, असे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
कुत्र्याला आंघोळ योग्य पद्धतीने घातली नाही. पेटशॉपमधील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे तरुणीने फिर्यादीत नमूद केले आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम कलम ११, तसेच अन्य कलमांन्वये पेटशॉपच्या मालकासह कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.