पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्राणिमात्रांवरील क्रूरतेला आळा घालण्यासाठी प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना जागृत करण्यासाठी पेटगाला हा पेट शो रविवारी (दि.13) पार पडला. या पेट शो अंतर्गत आयोजित केलेल्या उपक्रमात दत्तक मोहिमेचा समावेश ही कार्यक्रमाची उजवी बाजू ठरली.
या मोहिमेचा उद्देश म्हणजे जास्त मांजर आणि कुत्र्यांना अशा घरांमध्ये दत्तक द्यायचे जिथे त्यांची विशेष काळजी घेत निगा राखली जाईल. बर्याच पुणेकरांनी मांजर आणि कुत्र्यांना दत्तक घेऊन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. फेलाइन क्लब ऑफ इंडिया या ब्रँडचे चार आंतरराष्ट्रीय परीक्षक यांनी कार्यक्रमाचा निकाल जाहीर केला.
अॅलन रेमंड (ऑस्ट्रेलिया), जॅन रॉजर्स (यूएसए), फडली फुआद (इंडोनेशिया), इंद्रा लुबिस (इंडोनेशिया) यांनी या शोमध्ये चॅम्पियनशिप कॅट शोचे परीक्षण केले. या कार्यक्रमात 200 हून अधिक मांजरांचा सहभाग होता, अशी माहिती साकिब पठाण यांनी दिली. पर्शियन, मेन कून, बंगाल आणि इंडीमाऊ यांसारख्या विविध जाती कार्यक्रमादरम्यान उपस्थित होत्या. इव्हेंटमध्ये पाळीव प्राण्यांच्या मनोरंजनासाठी काही खास मज्जा-मस्तीही अनुभवायला मिळाली.