Underground Tunnel Pudhari
पुणे

Pune Underground Tunnel Project: पुण्यात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ३१ किमीचे दोन भुयारी मार्ग! भोसरी-उंड्री आणि भूगाव-एरंडवणे जोडणार

‘पाताळ लोक’ प्रकल्पाला महापालिका आयुक्तांची मंजुरी; २३ आणि ८ किमीच्या बोगद्यांसाठी डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महापालिकेने 'पाताळ लोक' प्रकल्पांतर्गत दोन महत्त्वाकांक्षी भुयारी मार्गांचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये भोसरी ते उंड्रीदरम्यान (२३ किमी) तर राम नदी (भूगाव) ते डी. पी. रोड (एरंडवणे) (८ किमी) बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. या दोन्ही मार्गांची एकूण लांबी ३१ किलोमीटर इतकी आहे. विविध वाहतूक संस्थांच्या सर्वेक्षणानुसार या दोन प्राथमिक मार्गाचा अहवाल तयार केला असून, आता या मार्गांचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तज्ज्ञ सल्लागार नेमण्यास महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना वाहनांची संख्या आणि वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाहतूक कोंडीचा हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाताळ लोक प्रकल्प (भुयारी मार्ग) राबविण्याची घोषणा केली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात येरवडा ते कात्रज या मार्गाचा पर्याय पुढे आला होता. मात्र, हा मार्ग फारसा व्यवहार्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर तो बारगळला. त्यानंतर अन्यही काही मार्गांबाबत चाचपणी करण्यात आली होती. आता मात्र काही तज्ज्ञ वाहतूक संस्थांकडून वाहतुकीसंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणा वरून नव्याने दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

दोन भुयारी मार्गांची आखणी

पुणे महापालिकेने केलेल्या प्राथमिक अभ्यासानुसार पहिला भुयारी मार्ग भोसरी ते उंड्री असा असेल. सुमारे २३ किलोमीटर लांबीच्या या मार्गाची भोसरी-संगमवाडी-धोबीघाट (पुणे कॅन्टोन्मेंट)-कोंढवा-उंड्री अशी प्रमुख जोडणी प्रस्तावित आहे. शहराच्या उत्तर भागापासून दक्षिण भागापर्यंत थेट वाहतूक जोडणी निर्माण करण्याच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. पुरंदरला होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीने भविष्यात हा भुयारी मार्ग अत्यंत महत्त्वाचा आणि सोयीचा असा ठरणार आहे. दुसरा भुयारी मार्ग राम नदी (भूगाव) ते डी. पी. रोड (एरंडवणे) असा आठ किलोमीटरचा प्रस्तावित आहे. राम नदी-डुक्कर खिंड-डी. पी. रोड अशी त्याची प्रमुख जोडणी असेल. पश्चिम भागातील वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देतानाच डुक्कर खिंड परिसरातील भौगोलिक अडथळा पार करण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरू शकतो.

ट्रॅफिक डेटाच्या आधारे आखणी

या दोन्ही मार्गांचा प्राथमिक अभ्यास करताना वाहतूक पोलिसांच्या मदतीने टॉमटॉम ओरिजिन-डेस्टिनेशन डेटा, गुगल ट्रॅफिक/रिअल-टाइम ट्रॅफिक इंटेलिजन्स डेटा, सीएमपी डेटा आणि ट्रॅव्हल पॅटर्नचा अभ्यास करण्यात आला आहे. प्रमुख वाहतूक मार्ग, त्यांच्यातील जोडण्यांमधील त्रुटी आणि संभाव्य पर्यायी मार्ग यांचा विचार करून ही आखणी करण्यात आली आहे. यापूर्वी पीएमआरडीएमार्फत तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात एचसीएमटीआर, इनर रिंग रोड (आयआरआर) आणि आउटर रिंग रोड (ओआरआर) यांच्याशी आवश्यक जोडणीचा पुरेसा विचार झाला नसल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद आहे. त्यामुळे केवळ स्वतंत्र बोगदे उभारण्याऐवजी शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांचे एकात्मिक जाळे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.

मेट्रो, रिंग रोडशीही जोडणीचा विचार

प्रस्तावित भुयारी मार्ग हे स्वतंत्र वाहतूक प्रकल्प म्हणून न पाहता एचसीएमटीआर, इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड, उड्डाणपूल आणि नदीवरील पुलांच्या समन्वित वाहतूकव्यवस्थेचा भाग असतील. महामेट्रो आणि एमएसआयडीसीच्या प्रस्तावित मार्गिकांचाही एकत्रित अभ्यास केला जाणार आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी मेट्रो मार्गिकांसोबत बससेवेचे योग्य नियोजन करण्याचाही प्रस्तावात समावेश आहे. या प्रकल्पांसाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करून सविस्तर व्यवहार्यता अभ्यास (डीएफएस) आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची पुढील कार्यवाही करण्यासंबंधीच्या प्रस्तावास महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. तांत्रिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि वाहतूकविषयक व्यवहार्यता तपासल्यानंतरच प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, हे मार्ग पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि संरक्षण मंत्रालयाच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असल्याने विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधावा लागणार आहे. त्यामुळे सध्या दोन्ही भुयारी मार्गांचा प्रस्ताव प्राथमिक नियोजनाच्या टप्प्यावर असून, प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी पुढील तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT