पुणे

पुणे-पानशेत रस्त्यावर दुर्घटनेची तलवार; सोनापूर येथे एकेरी वाहतूक

अमृता चौगुले

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूरजवळील पूल व रस्ता पुन्हा खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक झाली आहे. बांधकाम विभागाने येथे एकेरी वाहतूक सुरू केली आहे. पर्यटकांसह हजारो नागरिकांना येथून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. बस, अवजड वाहनांना सावधानता बाळगावी लागत आहे.

या पुलासाठी शासनाने पाच कोटी रुपयांच्या निधी मंजूर केला आहे. मात्र, लालफितीमुळे अद्यापही काम सुरू झालेले नाही. दुसरीकडे खचत चाललेल्या रस्त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात लागोपाठ दोन दिवस जोरदार अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे धरणाशेजारील पूल व रस्त्याचा मोठा भाग खचला. जवळपास शंभर फूट अंतराचा रस्ता पुलाच्या दोन्ही बाजूला खचला आहे. एका बाजूला डोंगर व दुसर्‍या बाजूला खोल धरण क्षेत्र आहे.

त्यामुळे येथून ये-जा करण्यासाठी पर्यायी जागा नाही. त्यामुळे बांधकाम विभागाने खबरदारीसाठी खचलेला रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. सावधानतेचा इशारा देणारा फलक लावला आहे. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. एम. लकडे म्हणाले, की पुलाच्या कामासाठी निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मंजुरीनंतर तातडीने काम सुरू केले जाणार आहे.

आमदार भीमराव तापकीर म्हणाले, की अनेक वर्षांपासून पूल व दोन्ही बाजूचा रस्ता खचत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करून पूल उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे पावसाळ्यापूर्वी सुरक्षित प्रवासासाठी रस्ता तयार करण्यात यावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

SCROLL FOR NEXT