वाल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील दौंडज खिंड ते निरादरम्यान अपघातांची मालिका सुरूच आहे. भोरवाडी फाटानजीक दौंडज खिंड येथील अवघड वळणावर बुधवारी (दि. 24) चालकाचा ताबा सुटल्याने मालवाहतूक ट्रक थेट पुणे-मिरज लोहमार्गावर जाऊन पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणती जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रकमधील खाद्यपदार्थांचे मोठे नुकसान झाले.
जेजुरी औद्योगिक वसाहत संपल्यानंतर भोरवाडी फाट्यापासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हा एकेरी होतो. या महामार्गावर अवघड वळणे आहेत. याच मार्गाने बुधवारी सचिन सखाराम कारांडे हा चालक त्याच्या ताब्यातील ट्रक (एमएच 12 टीव्ही 9030) मधून बिस्किट, चॉकलेट, कुरकुरे आदी खाद्यपदार्थ घेऊन जात होता.
दौंडज खिंड येथील वळणावर अचानक चारपदरी रस्ता एकेरी झाल्याने कारांडेचा ट्रकवरील ताबा सुटला आणि भरधाव ट्रक थेट रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या दगड गोट्यातून जात जवळपास 15ते 20 फूट खोल पुणे-मिरज लोहमार्गावर जाऊन पलटी झाला.
सुदैवाने या अपघातात कारांडे सुखरूप बचावला. तसेच या वेळी लोहमार्गाने कोणती रेल्वे आली नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
या अपघातामुळे काही काळ रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेत रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, रेल्वे पोलिस व रेल्वेची यंत्रणा आलेली होती. ते पुढील कार्यवाही करीत आहेत