Asavari Jagdale Pune Pudhari
पुणे

Asawari Jagdale Pune: पहलगाम हल्ल्यानंतर वर्षभराने न्याय; आसावरी जगदाळे यांची महापालिकेत नियुक्ती, पद कोणते?

Pahalgam Attack Victim Family Job: दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबाला दिलासा; शासनाचा ‘विशेष बाब’ निर्णय, महापौरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

पुढारी वृत्तसेवा

निनाद देशमुख

पुणे: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाल्यानंतर वर्षभर न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्यांच्या कुटुंबाला अखेर दिलासा मिळाला आहे. संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिका येथे वर्ग-२ (प्रशासकीय अधिकारी) पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

महापौर मंजुषा नागपूरे यांच्या हस्ते, सभागृह नेते गणेश बिडकर आणि आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत आसावरी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केले. पहलगाम दुर्घटनेनंतर जगदाळे कुटुंबाच्या सांत्वनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली होती.

त्या वेळी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या पार्श्वभूमीवर आसावरी यांना शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. प्रशासकीय प्रक्रियेमुळे काही विलंब झाला असला, तरी शिंदे यांनी महापालिका प्रशासनाशी थेट संवाद साधून प्रक्रिया गतीमान करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

‘विशेष बाब’ म्हणून वर्ग-२ पद

आसावरी जगदाळे यांनी संगणक शास्त्रात पदवी तसेच मानव संसाधन व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करून त्यांना समकक्ष पद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सामान्यतः महापालिका स्तरावर वर्ग-३ किंवा वर्ग-४ पदे भरण्याचे अधिकार असतात; मात्र राज्य शासनाने ‘विशेष बाब’ म्हणून आसावरी यांच्यासाठी वर्ग-२ (प्रशासकीय अधिकारी) पदाला मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांचा फोन

आसावरी संतोष जगदाळे यांना पुणे महापालिकेत नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आसावरी यांचे अभिनंदन केले. 'तुम्ही पाठपुरावा केल्याने हे शक्य झालं', अशा भावना आसावरी यांच्या आईने फडणवीस यांच्याकडे व्यक्त केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT