पुणे

Pune News : ओतूरमध्ये दुचाकीने घेतला पेट; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील जुन्या बसस्थानक परिसरात हॉटेल दत्तसमोर उभ्या असलेल्या बुलेट दुचाकीने अचानक पेट घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, ग्रामस्थांनी तत्परता दाखवत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना मंगळवारी (दि. ३) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.

हॉटेल दत्तचे मालक दत्तात्रय लोखंडे यांनी याबाबत माहिती दिली. जुन्या बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या बुलेट दुचाकीला अचानक आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी पोत्याच्या साहाय्याने तसेच पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने हे प्रयत्न निष्फळ ठरले.

दरम्यान, एका नागरिकाने समयसूचकता दाखवत पेट घेतलेल्या भागावर ओंजळीने माती टाकण्यास सुरुवात केली. मातीचा मारा करताच आगीची तीव्रता कमी होण्यास मदत झाली आणि अखेर आग पूर्णपणे आटोक्यात आली. वाहनाच्या वायरिंगमधील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT