Money Pudhari
पुणे

NHM Salary Delay: एनएचएम कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब; आरोग्यसेवांवर परिणामाची भीती

दोन महिन्यांचे वेतन थकले; पुण्यासह राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत हजारो कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नव्हते. गुरुवारी केवळ फेबुवारी महिन्याचा पगार जमा करण्यात आला. गेल्या पंधरा महिन्यांपासून वेतन सलग मिळण्यात विलंब होत आहे. या विलंबामुळे अत्यावश्यक आरोग्यसेवांमध्ये अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा कार्यकर्त्यांनाही केंद्र शासनाकडून गेल्या दीड वर्षापासून मानधन मिळालेले नाही.

महाराष्ट्रात सुमारे 42 हजार कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून, त्यापैकी पुणे जिल्ह्यात 2,855 कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये डॉक्टर, नर्सेस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, समुदाय वैद्यकीय अधिकारी तसेच इतर तांत्रिक व गैर-तांत्रिक कर्मचारी यांचा समावेश आहे. वेतनाच्या विलंबाचा प्रश्न मागील 16 महिन्यांपासून कायम आहे.

घरभाडे, शाळेची फी आणि दैनंदिन खर्च भागवताना अनेकांना अडचणी येत आहेत. वारंवार आश्वासने दिली जात असली तरी वेतन नियमित कधी होणार याबाबत स्पष्टता नाही. आमच्या कामाला महत्त्व दिले जाते. मात्र, आमच्या जगण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे संघटनेकडून सांगण्यात आले.

दोन महिन्यांहून अधिक काळाचे वेतन थकले होते. त्यापैकी केवळ एका महिन्याचे वेतन सोमवारी जमा झाले. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन जमा होणे अपेक्षित असते. मात्र, हा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झालेला नाही आणि राज्य सरकारनेही पुरेशी तरतूद केलेली नाही.
हर्षल रणावरे, राज्य समन्वयक, एनएचएम कर्मचारी संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT