पुणे : पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचा ४१ वा वर्धापनदिन संघटनेच्या नारायणपेठ येथील कार्यालयात सत्यनारायण पूजा व विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पहाटे पुणे व पिंपरी चिंचवड भागातील अंक विक्री केंद्रावर केक कापून तसेच फटाके वाजवून साजरा करण्यात आला.
यानिमित पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या नारायणपेठ येथील कार्यालयात स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पारगे यांनी सर्वाना शुभेच्छा देत यापुढील काळात देखील संघटनेचे कार्य असेच विक्रेत्यांच्या हिताचे निर्णय घेऊन विक्रेत्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ करण्याबाबत सर्व पदाधिकारी प्रयत्नशील राहतील व भविष्यात अंक वाढीसाठी सर्व विक्रेते देखील सर्व व्यवस्थापनांना संपूर्ण सहकार्य करतील असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छांचा स्वीकार पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांनी केला. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष अनंता भिकुले, सचिव अरुण निवंगुणे, खजिनदार संदीप शिंदे यांच्यासह विश्वस्त, विभागप्रमुख, पदाधिकारी, वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.