पुणे: पदपथावर लावलेल्या दुचाकीवर कारवाई करणार्या वाहतूक पोलीस अंमलदारांसह टोईंगवरील कर्मचार्याला दोन महिलांनी धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना हडपसर परिसरात घडली.
या वेळी वाहतूक अंमलदाराच्या डोक्यात चप्पलेने मारहाण केल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बालिका आणि संगीता अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार आजिनाथ आघाव यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हडपसर वाहतूक विभागात कार्यरत असलेले हवालदार आघाव यांनी गाडीतळ भागात बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनावर मंगळवारी सकाळी कारवाई करत होते. त्या वेळी आरोपी महिलांनी हडपसर परिसरातील गाडीतळ भागात बेशिस्तपणे दुचाकी लावली होती.
ती वाहने उचलणार्या गाडीतील कर्मचारी (टोईंग व्हॅन) आरोपी महिलांची दुचाकी उचलत होते. त्या वेळी आरोपींनी कारवाईस विरोध करून त्यांना मारहाण केली. दरम्यान, हा प्रकार पाहून आघाव महिलांना समजावून सांगत होते. त्या वेळी त्यातील एका महिलेने हवालदार आघाव यांच्या डोक्यात चपलेने मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.