पुणे

Pune News : स्वारगेट नव्हे हे तर धूळगेट

Laxman Dhenge

पुणे : शहरात शिवाजीनगर, लोहगावपेक्षाही स्वारगेट हा भाग प्रदूषित आहे, असे असूनही या भागात प्रदूषण मोजणारे केंद्रच नाही. या भागात दर सेकंदाला शेकडो वाहनांची कोंडी झालेली असते. इथे पुण्याबाहेरून आलेला प्रत्येक प्रवासी गोंधळून जातो. इतका वाहन गर्दीचा सामना त्याला करावा लागतो. मात्र, येथील कायमस्वरूपी व ठोस उपाययोजनांकडे प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे.
शहरात सफर या संस्थेची दहा प्रदूषण मोजणारी केंद्रे आहेत.

तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण (एमपीसीबी) मंडळाची पाच, अशी पंधरा केंद्रे शहराचे प्रदूषण मोजतात. यात कर्वे रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कात्रज डेअरी, येथील प्रदूषण एमपीसीबी मोजते, तर लोहगाव, शिवाजीनगर, पिंंपरी-चिंचवड, भोसरी या सर्व भागांचे प्रदूषण आयआयटीएमची सफर संस्था मोजते. मात्र, स्वारगेटसाठी प्रदूषण मापक यंत्र नसल्याने स्वारगेटची हवा नेमकी किती प्रदुषित आहे याचा अंदाज दिला जात नाही.

स्वारगेटवर हवे स्वतंत्र केंद्र

स्वारगेटवर शहरातील सर्वाधिक वाहनांचा गुंता रोज पाहावयास मिळतो. इथे मोठे बसस्थानक आहे. मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि गोवा राज्याकडे जाण्यासाठी या भागातून गाड्या जातात. त्यामुळे नागरिकांची या भागात सर्वाधिक ये-जा सुरू असते. स्वारगेट हा भाग शहराच्या मध्यवस्तीत येत असल्याने स्थानिक वाहतुकीचा मोठा भार या भागावर आहे. उड्डाणपुलाखाली बस, रिक्षा, खासगी वाहने विचित्र पध्दतीने उभी असतात. त्यामुळे वाहनधारकांना या भागातून वाट काढत जाणे हे मोठे दिव्यच आहे. येथून सुटलो की जीव भांड्यात पडतो, असे नागिकांचे मत झाले आहे. या भागात प्रदूषण मोजण्यासाठी स्वतंत्र केंद्र असण्याची गरज आहे. कारण आता येथे मेट्रोचे मोठे स्टेशन होत आहे. ते आता पूर्णत्वाकडे जात असल्याने पुढे या भागात सध्यापेक्षाही अधिक वाहन कोंडी व गर्दी वाढण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

'पुढारी'च्या वृत्तानंतर दंडात्मक कारवाई

'पुढारी'तील वृत्तमालिकेची दखल घेत महापालिका अधिकार्‍यांनी आता विविध संस्था संघटनांना प्रदूषण कमी करण्याच्या जागृती मोहिमेत सहभागी केले आहे. मेट्रोसह बिल्डरांच्या संघटनांना परिपत्रके पाठवून काय काळजी घ्यावी याची नवी मार्गदर्शन सूची तयार केली आहे. शुक्रवारी तळजाई टेकाडी भागात भला मोठा कचरा बंगल्याच्या आवारात जाळणार्‍या नागरिकांवर पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई केली. कचर्‍याचा धूर इतका होता की, त्याने श्वास घेण्यास लहान मुलांना त्रास होऊ लागल्याने नागरिकांनी फोन करून तक्रार केली. पालिकेच्या पथकाने बंगल्यात जाऊन घरमालकाला 500 रुपयांच्या दंडाची पावती दिली. तसेच जाळत असलेल्या कचऱ्यावर पाणी टाकण्यास सांगितले.

विदेशी एजन्सी मोजते येथील हवा प्रदूषण

शहराच्या प्रदूषणावर विदेशी एजन्सीचेही लक्ष असून, स्वित्झर्लंड येथील आयक्यू एअर ही कंपनीदेखील शहरातील हवेचे प्रदूषण दर सेकंदाला मोजत आहे. यात आयआयटीएमची सफर संस्था व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण यांची निरीक्षणे अधिकृत म्हणून नोंदवली जातात. मात्र, स्वारगेटसाठी स्वदेशी यंत्रणा नसल्याने या संस्थेच्या रिडिंगचा आधार घ्यावा लागतो.

स्वारगेटला आमचे अ‍ॅटोमॅटिक नाही, पण मॅन्युअल केंद्र होते. मात्र, तेथे मेट्रोचे काम सुरू असल्याने तेथील केंद्र हलवावे लागले. या भागात वाहन कोंडी असल्याने वायुप्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर आहे हे खरे आहे. आता येथील केंद्र डेक्कन परिसरात आहे. मेट्रोचे स्टेशन पूर्ण झाल्यावरच येथे नव्याने केंद्र बसवले जाईल.

– डॉ. नितीन शिंदे, उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT