पुणे : खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत भूमिगत जलवाहिनी झाल्यानंतर उजवा मुठा कालव्याची मोकळी होणारी जागा मेट्रो आणि बसमार्गासारख्या सार्वजनिक हितासाठी वापरण्याची शिफारस जलसंपदा विभागातील काही अधिकार्यांनी केली होती. मात्र, तिच्या व्यावसायिक वापराने मिळणार्या 'लाभा'कडे जलसंपदासह विविध विभागांतील काही वरिष्ठ बाबूंचे आणि राजकीय मंडळींचे लक्ष लागले असल्याने सर्वेक्षणाचा फार्स करून सार्वजनिक जागा बिल्डरांच्या घशात घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते.
खडकवासला धरणापासून सुरू होणारा मुठा उजवा कालवा इंदापूरपर्यंत आहे. हा कालवा शहरातील मध्यवर्ती भागातून जात आहे. या कालव्यातून गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत आहे. त्यामुळे खडकवासलापासून ते फुरसुंगी या 34 किलोमीटरपर्यंत भूमिगत जलवाहिनी करण्याचे नियोजित आहे. त्यासाठी आता शासनाकडून मान्यता मिळणे बाकी राहिले आहे. असे असले, तरी भूमिगत जलवाहिनी झाल्यानंतर रिकाम्या झालेल्या उजवा मुठा कालव्याच्या जागेवर सहा पदरी रस्ता करणे योग्य राहील, अशी शिफारस करणारा अहवाल जलसंपदा विभागाने शासनाकडे दिला होता.
या कालव्यावर सहा पदरी रस्ता आणि उंचावरून मेट्रो मार्गिका करता येईल, असे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले होते. दरम्यान, मुंबई दरबारी सूत्रे फिरली आणि या जागेचा व्यावसायिक वापर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या रिकाम्या होणा-या जागेमुळे अनेक दशके बांधकाम व्यावसायिकांपासून (बिल्डर) ते सरकारी बाबूंपर्यंत अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. ही जागा बिल्डरांच्या घशात जाण्याची शक्यता वेळोवेळी व्यक्त केली आणि यांचा भांडाफोड 'पुढारी'ने केला, त्या वेळी या कालव्याच्या रिकाम्या जागेवर रस्ताच होणार असल्याचे वरकरणी उत्तर देण्यातआले.
आता मात्र प्रशासनातील वेगवेगळ्या विभागांतील अधिकार्यांच्या लॉबीचे खायचे दात बाहेर आले असून, या जागेचा 'अर्थपूर्ण' व्यवहार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातूनच या जागेचा अधिकाधिक चांगला वापर कसा करता येईल, याचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचा शहाजोग आणि साळसूद पवित्रा प्रशासनाने घेतला आहे आणि महापालिकेतील बाबूंनी सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. या सर्वेक्षणामध्ये या मोक्याच्या जागेचा व्यावसायिक वापर करणेच योग्य ठरेल, असाच निष्कर्ष काढण्यात येणार असून, तो निष्कर्ष सर्वेक्षण होण्याआधीच सरकारी बाबूंनी काही राजकीय नेत्यांच्या साथीने ठरवूनच टाकला असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून, केवळ उड्डाणपूल कोंडी सोडवू शकणार नाही. कारण उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर काही वर्षांतच त्या पुलावर कोंडी होते असा अनुभव येतो. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था असलेला रस्ता कालव्याच्या जागी करावा, अशी शिफारस वाहतूक तज्ज्ञांपासून काही अधिका-यांनी केले. मात्र, आपल्याच अधिकार्यांच्या या शिफारशीला डावलण्याचा निर्णय अतिवरिष्ठ पातळीवरून घेण्यात आल्याचे समजते. परिणामी, प्रशासनाला चांगलाच 'चुना' लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा