पुणे : सिंहगड रस्त्यावरील विश्रांतीनगर भागात पाणीपुरवठा करणाऱ्या दोन लोखंडी वाहिन्यांमध्ये अडकलेल्या तीन वर्षे वयाच्या अन् तब्बल ७०० किलो वजनाच्या बालगव्याला जिवंत बाहेर काढण्यात यश आले. सुमारे अडीच तास सुरू असलेले 'ऑपरेशन गवा' फत्ते झाले. यात वन विभाग, महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि रेस्क्यू संस्थेची टीम, अशा सुमारे पन्नास कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
मंगळवारी ३० जून रोजी सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांनी वन विभागाला नागरिकांनी सिंहगड रस्त्यावरील विश्रांतीनगर भागातील कालव्याच्या पाइपलाइनमध्ये मोठा हा रानगवा अडकल्याची माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गवा अत्यंत अवघड जागेत अडकल्याने नियोजनबद्ध पद्धतीने काढण्याची योजना आखावी लागली. सुमारे अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर त्या गव्याला अखेर जखमी अवस्थेत; पण सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. गवा हा शेड्यूल वन (अतिसंरक्षित गटात) येत असल्याने गवा दिसला की, त्याला जिवंत आणि सुखरूप पकडण्यासाठी वन विभागाची धावपळ होते.
अंदाजे ३ वर्षे वयाचा, ७०० किलो वजनाचा बालगवा पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मोठ्या पाइपमध्ये अडकला होता.
तो दोन पाइपमध्ये एक ते दीड मीटर अंतर असल्याने वर येणे अवघड होते. तो पाइपला धडका मारून जखमी झाला होता. प्रचंड बिथरलेला होता.
छोट्या अन् चिंचोळ्या जागेतून त्याची सुटका करणे अत्यंत किचकट आणि आव्हानात्मक होते.
परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतर पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रानगव्याला सुरक्षितपणे काढणासाठी योजना आखण्यात आली.
या ठिकाणी क्रेन आणून त्याचे दोन पट्टे त्याच्या पोटाभोवती आवळून वर काढण्याचे ठरले.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांची गर्दी कमी करण्याचे आवाहन करीत परिसर सील केला.
गव्याच्या पोटाभोवती क्रेनचे पट्टे टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले. गवा भंयकर चिडलेला, बिथरलेला असल्याने सारखा मागे-पुढे करीत पाइपला धडका देत होता.
तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर क्रेनचे दोन पट्टे त्याच्या पोटाभोवती पडताच ते आवळून त्याला हळुवार वर खेचण्यात आले. तेव्हा प्रचंड गर्दीने सुटकेचा नि:श्वास सोडत टाळ्या वाजवल्या.
गव्याला अनेक जखमा झालेल्या होत्या. त्याच्या तोंडावर कापड टाकून भुलीचे इंजेक्शन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आणि वेगाने बावधन येथील केंद्रात पाठविण्यात आले.
सकाळी ११.५१ ते दुपारी २.३० पर्यंत हे 'ऑपरेशन गवा रेस्क्यू' सुरू होते.
निरीक्षणासाठी त्याला वन विभागाच्या बावधन येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे हलविण्यात आले आहे.
त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे.
या संपूर्ण बचाव मोहिमेचे नेतृत्व पुणे वन विभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे वन विभागाचे नव्याने रुजू झालेले उपवनसंरक्षक अभिजित वायकोस यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून केले.
भांबुर्डा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले, त्यांच्या आधिपत्याखालील वनपाल, वनरक्षक व इतर वनकर्मचारी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी यांनी अथक परिश्रम घेत ही मोहीम यशस्वी केली.
विश्रांतीनगर येथील ही मोहीम अत्यंत आव्हानात्मक होती. मात्र, वन विभाग, पोलिस, अग्निशमन दल, पुणे महानगरपालिका, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे रानगव्याला कोणतीही मोठी दुखापत न होता सुरक्षित सुटका करण्यात आम्हाला यश आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येईल.- अभिजित वायकोस, उपवनसंरक्षक, वन विभाग, पुणे
हे गव्याचे पिल्लू असून, वय अंदाजे ३ वर्षे असावे. त्याचे वजन सुमारे ७०० किलो आहे. मोठ्या गव्याचे वजन हे दीड टनापर्यंत असते. हे पिल्लू असूनही ७०० किलाे वजन असल्याने त्याला क्रेनशिवाय बाहेर काढणे शक्य नव्हते.- मनोज बारबोले, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा, पुणे
दोन चिंचोळ्या पाइपलाइनमध्ये अडकलेल्या ७०० किलो वजनाच्या महाकाय रानगव्याला क्रेनच्या साहाय्याने असे बाहेर काढण्यात आले. त्याची ही क्षणचित्रे.