पुणे

Pune News : ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे (वय 62 रा. कोथळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी (दि.13) दुपारी पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कोथळे गावी कऱ्हा नदीकाठी आज, सोमवारी (दि. १३) रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

प्रकाश भोईटे यांनी पुढारी, देशदूत, ऐक्य, पुण्यनगरी, देशोन्नती या वृत्तपत्रांमध्ये प्रदीर्घकाळ वार्तांकन केले. सध्या ते दैनिक केसरीमध्ये कार्यरत होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याबरोबर त्यांनी काम केले आणि संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याबरोबर देखील त्यांनी काम केले. शेतकरी आणि पत्रकारांच्या प्रश्नावरील आंदोलनातही त्यांनी वेळोवेळी सहभाग घेतला होता.

दि पूना मर्चन्टस चेबरतर्फे दिला जाणारा कै. वी. ल. गवाडिया आदर्श पत्रकार पुरस्कार, पुणे जिल्हा परिषदेचे ग्रामस्वच्छता अभियान पारितोषिक त्यांना मिळाले होते. महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे महासचिव, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. पत्रकार हल्ला विरोधी कायद्यासाठी देखील त्यांनी लढा दिला होता. राजकीय विषयावरील बातम्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या अनेक बातम्या राज्यभर गाजल्या. कृषि, सहकार, साखर विषयावरही त्यांनी निर्भीड पत्रकारिता केली.

पुरंदर तालुक्यातील कोथळे गावच्या विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. अनेक लोकाभिमुख कामे त्यांनी गावांमध्ये उभी केली. कोथळे गावातील वाचनालयाचेदेखील अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी जयश्री भोईटे या कोथळे गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष अँड धनंजय भोईटे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय भोईटे, पत्रकार प्रताप भोईटे हे त्यांचे बंधू होत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT