पुणे

Pune News : ससूनचे अधीक्षकपद बनले संगीतखुर्ची! दीड वर्षांत पाचजण

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधीक्षकपद गेल्या दीड वर्षांत पाच वेळा बदलले आहे. अंतर्गत राजकारण आणि चढाओढीचा परिणाम थेट अधीक्षकपदावर होत असून, सातत्याने होत असलेल्या बदलांचा परिणाम ससूनच्या कार्यपद्धतीवरही होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून डॉ. किरणकुमार जाधव ससूनचे अधीक्षक म्हणून काम पाहत होते. शुक्रवारी दुपारी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी बदलीचे आदेश काढले. डॉ. अजय तावरे यांच्याकडे अधीक्षक पदभार सोपवण्यात आला आहे. ससूनचे वैद्यकीय अधीक्षक पद ही संगीतखुर्ची बनल्याची चर्चा ससून रुग्णालयाच्या वर्तुळात सुरू झाली आहे.

डॉ. अजय तावरे यांच्याकडे दीड वर्षांपूर्वी अधीक्षक सोपवण्यात आले होते. रूबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरण उघडकीस आल्यावर ससूनच्या समितीने मान्यता दिल्याप्रकरणी डॉ. तावरे यांचे पद मे 2022 मध्ये काढून घेण्यात आले. या पदावर जुलै 2022 मध्ये फार्माकॉलॉजी विभागाच्या डॉ. भारती दासवानी यांची नियुक्ती करण्यात आली. जानेवारी 2023 मध्ये डॉ. संजीव ठाकूर अधिष्ठाता झाल्यानंतर त्यांनी मार्चमध्ये डॉ. दासवानी यांची नियुक्ती रद्द केली आणि त्या ठिकाणी तत्कालीन उपअधीक्षक डॉ. विजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. जाधव यांची बदली सातारा वैद्यकीय महाविद्यालयात केली. रिक्त झालेल्या पदावर डॉ. यल्लापा जाधव यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला. वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी लाच घेताना एका कर्मचार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर डॉ. ठाकूर यांनी डॉ. यल्लपा जाधव यांच्याऐवजी डॉ. सुनील भामरे यांच्याकडे जबाबदारी दिली. यानंतर महिनाभरात ही जबाबदारी शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. किरणकुमार जाधव यांच्याकडे आली. आता ती पुन्हा डॉ. तावरे यांच्याकडे देण्यात आली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT