पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) निवडणूक धोरण आणि प्रचाराची धुरा सांभाळणारे नरेश अरोडा आणि त्यांच्या 'डिझाइनबॉक्स्ड' संस्थेच्या पुणे कार्यालयात आज गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकल्याचे समोर आले आहे. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची अधिकृत भूमिका एक्स पोस्टद्वारे स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका मांडली असून, ही केवळ एक तांत्रिक माहिती घेण्याची प्रक्रिया होती, असे सूचित केले आहे.
क्राईम ब्रँचचे अधिकारी काही माहिती घेण्याच्या उद्देशाने या कार्यालयात उपस्थित झाले होते. या प्रक्रियेदरम्यान 'डिझाइनबॉक्स्ड'च्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना हवी ती सर्व माहिती पुरवण्यात आली असून तपासात पूर्ण सहकार्य करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या प्राथमिक चौकशीत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा अनियमितता आढळून आलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, पक्ष नरेश अरोडा आणि त्यांच्या संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच कायद्याचा सन्मान करतो आणि सर्व वैधानिक प्रक्रियांना सहकार्य करण्यावर आमचा विश्वास आहे. या प्रकरणातही यंत्रणांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात आले आहे.
या संवेदनशील विषयावर भाष्य करताना पक्षाने कार्यकर्त्यांना आणि जनतेला आवाहन केले आहे की, या विषयावर कोणताही संभ्रम किंवा अफवा पसरवू नका. कोणतेही अनावश्यक नैरेटिव्ह (चुकीची माहिती) सेट करण्याचा प्रयत्न करू नये. केवळ तथ्यांच्या आधारेच निष्कर्ष काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.