नारायणगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या आगामी निवडणुकीसाठी जुन्नर तालुक्यातील विकास सोसायट्यांच्या मतदार प्रतिनिधी ठरावांची प्रक्रिया मंगळवारी (दि. २२) अंतिम झाली,त्यावेळी तालुक्यातील ७६ विकास सोसायट्यांचे प्रतिनिधी ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयात प्राप्त झाले.
वडज विकास सोसायटीकडून संतोष चव्हाण यांच्या नावाचा प्रतिनिधी ठराव अंतिम दिवशी दाखल करण्यात आला. दरम्यान, संस्थेच्या सचिवाबाबत वडज संस्थेने पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती असून संबंधित सचिव संस्थेचे प्रोसिडिंग बुक व शिक्के घेऊन गेल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आल्याचे समजते.
हिवरे तर्फे नारायणगाव विकास सोसायटीच्या प्रतिनिधी निवडीबाबत एकमत न झाल्याने या संस्थेचा ठराव झाला नसल्याची माहिती आहे.
नारायणगाव विकास सोसायटीकडून आमदार शरद सोनवणे यांच्या नावाचा ठराव दाखल झाला आहे मात्र सोनवणे यांच्या गावातील सोसायटीकडून बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांचा ठराव झाल्याची माहिती आहे.
बँकेचे विद्यमान संचालक संजय काळे यांच्या नावाचा ठराव दाखल झाला असताना त्यांचे पुत्र प्रथमेश यांच्या नावाचा ठराव ही आगर सोसायटीकडून करण्यात आला आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या नावाचा ठराव शिरोली बुद्रुक सोसायटीकडून करण्यात आला. दिवंगत आशाताई बुचके यांच्या वैष्णव सोसायटीतून देविदास राजाराम पवार यांच्या नावाचा ठराव करण्यात आला आहे.पिंपळगाव तर्फे नारायणगाव विकास सोसायटीतून ह.भ.प. पंकज महाराज गावडे, वडगाव आनंद सोसायटीतून सचिन वाळुंज, तर उच्छील सोसायटीकडून भाऊ देवाडे यांच्या नावाचे ठराव झाल्याची माहिती आहे.
जुन्नर तालुक्यातून आमदार शरद सोनवणे, सत्यशील शेरकर, विद्यमान संचालक संजय काळे त्यांचे पुत्र प्रथमेश , सचिन वाळुंज, संतोष चव्हाण आणि रघुनाथ लेंडे यांच्यासह विविध इच्छुकांच्या नावाने मतदार प्रतिनिधी ठराव झाल्याने आगामी निवडणुकीतील 'अ' वर्ग गटाकडे लक्ष लागले आहे. जुन्नर तालुक्यातील विद्यमान संचालक संजय काळे यांच्या नावाची घोषणा माजी आमदार अतुल बेनके यांनी यापूर्वीच केली आहे. तथापि संजय काळे यांच्या उमेदवारीला रिझर्व्ह बॅकेच्या नवीन नियमामुळे अडचण आल्यास त्यांचे पुत्र प्रथमेशयांचे नाव पुढे येऊ शकते.एकंदरीत काळे विरुद्ध आ. शरद सोनवणे अथवा काळे विरुद्ध संतोष चव्हाण किंवा काळे विरुद्ध रघुनाथ लेंडे असा सामना होऊ शकतो.
जिल्हा बँकेचे मुख्य मार्गदर्शक दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनामुळे बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे समजते. भाजप, शिवसेना शिंदे गटाला काही जागा देऊन अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.