पुणे : शहर परिसरात गुन्हे करणार्या आणि महिनोन्महिने वॉन्टेड असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिस आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार आहेत. यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित "फेस रिकग्नायजेशन" यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असून, या माध्यमातून शहर, राज्यासह देशभरात वॉन्टेड असलेल्या आरोपींना ओळखणे शक्य होणार आहे.
शहरात लवकरच अशाप्रकारचे अत्याधुनिक जवळपास 2 हजार 880 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी पुढील सहा महिन्यांत प्रकल्प कार्यान्वित होणार असून, यासाठी 434 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने पुणे पोलिसांनी हे पुढचे पाऊल टाकले आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मेट्रो शहरात गुन्हेगारी घटनांची संख्या सर्वाधिक आहे. यातच काळानुरूप गुन्हेगारदेखील हाय टेक झाल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण होत आहे.
तर, अनेकदा एका शहरात गुन्हा करून आरोपी दुसर्या शहरात वास्तव्य करतो. त्यामुळे वर्षानुवर्षे आरोपी मिळून येत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडूनदेखील अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आरोपींना पकडण्यासाठी नियोजन तयार केले जात आहे.
शहरातील गर्दीच्या ठिकाणी याप्रकारचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रमुख शहरांना दहशतवादी हल्ल्याचा धोकादेखील असतो.
गर्दीच्या ठिकाणी अशा हालचाली होतात. अशा ठिकाणाहून गुन्हेगारांना पळ काढणे सोपे असते. परंतु, या यंत्रणेची अंमलबजावणी केल्यास हा धोका कमी होणार आहे. दरम्यान, सीसीटीएनएस म्हणजेच 'क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम'मध्ये गुन्हेगारांची कुंडली उपलब्ध असते. पोलिस प्रक्रियेचे संगणकीकरण, गुन्हे आणि गुन्हेगारी नोंदींच्या डेटाबेसवर संपूर्ण देशात शोध घेण्यास मदत करणे, राज्य आणि केंद्रात गुन्हे व गुन्हेगारी अहवाल तयार करणे आदींसाठी सीसीटीएनएस महत्त्वाचे ठरते. या माध्यमातून गुन्हेगाराचा अभिलेख पाहणे सोपे जाते. ही यंत्रणा या प्रक्रियेत पोलिसांना फायदेशीर ठरणार आहे.
'सीसीटीव्ही"च्या माध्यमातून "फेस रिकग्नायजेशन सिस्टीम"चे काम चालणार आहे. सीसीटीव्हीच्या छत्रछायेखाली येणार्या प्रत्येक नागरिकाचा चेहरा या यंत्रणेच्या माध्यमातून "कॅप्चर" होईल. त्यानंतर पुणे पोलिसांकडे असणार्या गुन्हेगारांच्या माहितीनुसार, गुन्हेगार किंवा संशयित यामध्ये आढळून आल्यास त्याची सूचना नियंत्रण कक्षाला मिळून संबंधित ठिकाणी तत्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे.
फेस रिकग्नायजेशन यंत्रणा असलेले सीसीटीव्ही शहर परिसरात बसविले जाणार आहेत. यामुळे वॉन्टेड गुन्हेगारांना पकडणे शक्य होईल. प्रायोगिक तत्त्वावर याची चाचणी घेतली जाईल. यानंतर शहरात जवळपास पावणेतीन हजार कॅमेरे बसविले जाणार आहेत.
रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर
हेही वाचा