पुणे

Pune News : दुभाजकात उभारला एलईडी बोर्ड; अपघाताचा धोका

Laxman Dhenge
बाणेर :  पुढारी वृत्तसेवा  : गेल्या अनेक महिन्यांपासून सूस रोडचे सुशोभीकरण सुरू आहे. या अंतर्गत पाषाण-सूस रोडवरील बालाजी चौक दुभाजकात स्मार्ट सिटी प्रशासनाने  एलईडी बोर्ड (व्हीएमएस) उभारला आहे. मात्र, हा बोर्ड चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आला असून, तो काढून एका बाजूला लावण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. सूस रोडवरून पुण्याच्या दिशेला जाणार्‍या बाजूने बालाजी चौकात दुभाजकामध्ये हा बोर्ड लावण्यात आलेला आहे. यामुळे या ठिकाणी असलेल्या सिग्नल झाकले जात आहेत. हा बोर्ड दुभाजकामध्ये असल्याने धोकादायकही ठरू शकत असल्याने या ठिकाणावरून हा बोर्ड काढून पूर्वी होता त्या ठिकाणी एका कोपर्‍यात लावण्यात यावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.
पथ विभागाच्या परवानगीने हा बोर्ड लावण्यात आला आहे. मात्र, वाहतूक विभाग न आकाशचिन्ह परवाना विभागाची यासाठी कोणतेही परवानगी घेण्यात आलेली नाही. हा बोर्ड दुभाजकामध्ये असल्याने वाहनचालकांचे लक्ष बोर्डवर गेल्याने अपघात होण्याची शक्यताही नकारता येत नाही. भाजप युवा मोर्चाचे रोहन कोकाटे म्हणाले, 'दुभाजकामध्ये हा बोर्ड चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला आहे. यामुळे सिग्नल झाकला जातो, तर दुभाजकांमध्ये एलईडी बोर्ड लावण्यास परवानगी कशी देण्यात आली, याची चौकशी
करण्यात यावी.'
दुभाजकामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचे बोर्ड उभारण्यास परवानगी देत नाही. या बोर्डसाठी  परवानगीचे पत्र  दिले असले, तरी तो चौकात एका बाजूला उभारणे अपेक्षित होते. संबंधित ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने उभारलेला बोर्ड लवकरात लवकर काढण्यात येईल.
– दिनकर गोंजारी,  कार्यकारी अभियंता, पथ विभाग, महापालिका

हेही वाचा

SCROLL FOR NEXT