पुणे : भूमिअभिलेख विभागाने राज्यातील जमीन मोजणी प्रक्रियेतील पारदर्शकता, गतिशीलता आणि सुसूत्रता वाढवण्यासाठी ‘डिजिटल मोजणी २.१ त ही सुधारित प्रणाली लागू केली आहे. या प्रणालीत अर्जदाराची आधार पडताळणी आणि ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यातून दुसर्याच्या जमिनीच्या मोजणीचे गैरप्रकार उघड होण्यास मदत होऊन पारदर्शकता येणार आहे.
ऑनलाईन मोजणीचे वेळापत्रक, नकाशे, ‘क’ प्रत या प्रणालीतून देण्यात येणार आहेत, अशी माहिती जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांनी दिली. ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर राज्यामधील १८ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
या नव्या प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जमीन मोजणीसाठी अर्ज करणार्या अर्जदाराची आधार कार्डद्वारे पडताळणी केली जाईल. यामुळे बनावट अर्ज, बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीच्या प्रकारांना मोठा आळा बसणार आहे.
या प्रणालीमध्ये अर्जदाराची ई-केवायसी करणे बंधनकारक असणार आहे. जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करताना मूळ मालक किंवा कायदेशीर अधिकृत व्यक्तीच अर्ज करीत आहे, याची खात्री याद्वारे होईल. यामुळे त्रयस्थ पक्ष किंवा अनधिकृत व्यक्तींकडून होणार्या अर्जांना पायबंद बसेल.
पूर्वी मोजणीसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेर्या माराव्या लागत असत. मात्र, या डिजिटल प्रणालीमुळे अर्ज करण्यापासून ते मोजणीची तारीख मिळणे आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त ‘क’ प्रत (नकाशा) डाऊनलोड करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन व सुटसुटीत झाली आहे.
सध्या ही प्रणाली राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवली जात असून, टप्प्याटप्प्याने ती संपूर्ण राज्यभरात कार्यान्वित केली जाईल. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात नुकतेच या प्रणालीचे उद्घाटन केले होते.
पूर्वीचे सर्व जुने आणि नवे मोजणी नकाशे या प्रणालीशी जोडण्यात आले आहेत. त्यामुळे मोजणी अर्ज स्वीकारण्यापासून ते डिजिटल स्वाक्षरीयुक्त ‘क’ प्रत (नकाशा) मिळेपर्यंतची सर्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि ऑनलाईन झाली आहे.