पुणे

Pune News : पुण्यात बांधकामांना सुगीचे दिवस

Laxman Dhenge

पुणे : महापालिका हद्दीमध्ये नवीन बांधकामे जोमात सुरू असून, बांधकाम विभागास मागील वर्षभरात दिलेल्या 1773 प्रकरणांच्या परवान्यांतून 2300 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे बांधकाम विभागाला महापालिकेच्या अंदाजपत्रकात दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, रेडिरेकनर वाढीच्या शक्यतेमुळे बांधकामांची परवानगी घेणार्‍यांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिकेच्या उत्पन्नामध्ये मिळकत कर, स्थानिक स्वराज्य संस्था कर आणि बांधकाम विभागाच्या उत्पन्नाचा सर्वाधिक वाटा असतो. परंतु, मागील काही वर्षांमध्ये कोरोना आणि बांधकाम व्यवसायातील मंदीमुळे महापालिकेला बांधकाम परवान्यांतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते.

त्याअगोदरची चार ते पाच वर्षे देखील बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे उत्पन्नाच्या दृष्टीने महापालिकेसाठी निराशाजनकच ठरली होती. त्यामुळे राज्य शासनाने कोरोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी आणि बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी 2021-22 मध्ये बांधकामाच्या प्रीमियम शुल्कामध्ये 50 टक्के सवलत देण्याचा, तसेच मुद्रांक शुल्कावर सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये महापालिकेला 2065.09 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. मात्र, 2022-23 या आर्थिक वर्षात बांधकाम विभागाचे उत्पन्न कमी होऊन 1635.94 कोटी झाले. त्यानंतरही महापालिकेच्या 2023-24 च्या अंदाजपत्रकात बांधकाम परवान्यातून 1 हजार 804.83 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले.

प्रत्यक्षात 1773 प्रकरणांच्या बांधकाम परवान्यातून महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 22428 कोटी रुपये उत्पन्न जमा झाले.
दरम्यान, मागील वर्षी रेडिरेकनरच्या दरात वाढ झाली नाही. ही वाढ या वर्षी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी आपल्या नवीन प्रकल्पांना मंजुरी घेण्यात आल्याने प्रस्तावांची संख्या व परवान्यातून मिळणारे उत्पन्न वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

'पीएमआरडीए'कडून 40 कोटी मिळाले

महापालिका हद्दीमध्ये समावेश झालेल्या 23 गावांमधील बांधकामांना परवानगी देण्याचा अधिकार 'पीएमआरडीए'ला देण्यात आले आहेत, तर या गावांमधील विकासकामे करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्यामुळे बांधकाम परवान्याचे 300 कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी महापालिकेकडून 'पीएमआरडीए'कडे करण्यात आली. त्यानुसार 'पीएमआरडीए'ने महापालिकेला 40 कोटी रुपये दिले आहेत. या रकमेचा बांधकाम विभागाच्या एकूण उत्पन्नामध्ये समावेश आहे.

शहरात व परिसरात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आहेत. तसेच, शहरात शैक्षणिक व आरोग्याच्याही चांगल्या सेवा-सुविधा आहेत. याशिवाय चांगले हवामान, पाणी यांमुळे देशातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात युवक व नागरिकांचा पुण्यात येण्याचा ओढा जास्त आहे. त्यामुळे घरांची मागणीही वाढलेली आहे. त्यानुसार बांधकामांच्या प्रस्तावांची संख्या वाढली आहे.

– प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT