पुणे

Pune News : आईच्या रागावण्यामुळे ५ चिमुकल्या भावंडांचे घरातून पलायन, थेट गाठले स्वारगेट बसस्थानक; मोठा अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

पुणे : उन्हाळी सुट्टी... आत्याचं घर... खेळण्याबागडण्याचे दिवस... पण या पाच चिमुकल्यांच्या मनात मात्र वेगळंच वादळ सुरू होते. “आई सतत रागावते, काम सांगते... आपण घर सोडून होस्टेलमध्ये राहायचे, खूप शिकायचे आणि मोठं माणूस बनायचे,” असा निरागस पण भावनिक विचार करत या पाच भावंडांनी थेट घरातून पलायन केले. त्यांच्या छोट्याशा मनात मोठी स्वप्नं होती; मात्र वास्तवाची झळ बसताच स्वारगेट बसस्थानकात त्यांची पावले थांबली आणि अखेर हा सगळा प्रवास अश्रूंमध्ये संपला.

मांजरी परिसरात १९ मे रोजी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. मुलांचे (मुलगी १४ वर्ष, मुलगी १४ वर्ष, मुलगी ९ वर्ष, मुलगा १४ वर्ष) आई-वडील सिंहगड रस्ता परिसरात राहून मोलमजुरी करतात. उन्हाळी सुट्टीमुळे फिर्यादी महिलेच्या तीन मुली आणि त्यांच्या नणंदेची दोन मुले आत्याकडे राहण्यासाठी मांजरी येथे आली होती. घरातील रागावणे, कामे सांगणे आणि गरीब परिस्थिती यामुळे मुलांच्या मनात स्वतःच्या आयुष्याबद्दल वेगळे स्वप्न तयार झाले होते. “होस्टेलमध्ये राहिलो तर शिकता येईल, चांगली नोकरी मिळेल आणि पैसे कमवता येतील,” असा बालमनाचा विचार करत त्यांनी कोणालाही न सांगता रिक्षा करून स्वारगेट गाठले.

बसस्थानकात पोहोचल्यावर मात्र वास्तव समोर आले. हातातील पैसे संपले, आसपासची गर्दी वाढली आणि भीतीने मुलांचे धाबे दणाणले. अखेर त्यांनी एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून पालकांना फोन केला आणि आपण स्वारगेट बसस्थानकात असल्याचे सांगितले. दरम्यान, मुलं बेपत्ता झाल्याने घाबरलेले पालक मांजरी पोलिस ठाण्यात धाव घेत होते. फोन आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ स्वारगेट गाठून सर्व मुलांना सुरक्षित ताब्यात घेतले.

यानंतर मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. यावेळी मुलांनी आई-वडिलांकडून कोणताही छळ होत नसल्याचे स्पष्ट केले. समुपदेशनानंतर सर्व मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डिगोळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT