पुणे : धाराशिवच्या 'क्युएनर्जी इंडस्ट्रीज' (भाऊसाहेब बिराजदार कारखाना) या कारखान्याने उसाची 'एफआरपी' वेळेवर दिली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. २४) पुण्यातील 'साखर संकुल'समोर धरणे आंदोलन सुरू केले. हक्काचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी क्युएनर्जी कारखान्याकडे दिला होता. मात्र, गाळप होऊनही एफआरपीची हक्काची रक्कम मिळाली नाही. या थकीत रक्कमेसाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलने केली होती. तरीही दाद न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांनी पुण्यात साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडला. "कारखान्याने अद्याप आमची बिले दिली नाहीत. ही रक्कम व्याजासहित देण्याचे आदेश देऊन ती त्वरित आमच्या खात्यात जमा करावी," अशी ठाम मागणी विकास पाटील यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या या आक्रमक आंदोलनानंतर प्रशासनाला दखल घ्यावी लागली. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी तत्काळ याप्रकरणी दोन दिवसांत सुनावणी ठेवण्याचे आदेश दिले असून, तशी नोटीस कारखान्याला बजावण्यात आली आहे.
क्युएनर्जी कारखान्याने १६ जानेवारी ते ३ मार्च दरम्यानच्या गाळपाचे ६ कोटी ८२ लाख १० हजार रुपये थकवले आहेत. तसेच, ईडाजावळा (ता. भूम) येथील 'आयान मल्टीट्रेड' कारखान्याकडे ५ कोटी ५३ लाख १४ हजार रुपयांची एफआरपी थकीत आहे. या दोन्ही कारखान्यांना नोटीस बजावली असून, गुरुवारी (दि. २७) सुनावणी होणार आहे.— यशवंत गिरी, साखर संचालक (अर्थ), साखर आयुक्तालय, पुणे