पुणे

Pune News : आणे परिसरातील शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

Laxman Dhenge

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : कुकडी प्रकल्पातील पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पठारावरील आणे, नळावणे, शिंदेवाडी, पेमदरा व आनंदवाडी येथील शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आणे येथे शेतक-यांनी पठार विकास संस्थेच्या माध्यमातून धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आणे पठारावरील शेतकरी कुकडी प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी उपलब्ध व्हावे यासाठी पठार विकास संस्थेच्या माध्यमातून लढा देत आहेत.

याबाबत संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकर दाते यांनी सांगितले की, तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांचे उपस्थितीत याबाबत बैठक झाली होती. पालकमंत्र्यांनी संबंधितांना या योजनेचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपस्थितीत बैठक झाली. मात्र, शासकीय पातळीवरून प्रतिसाद मिळत नसल्याने आणे पठारावरील शेतकरी आक्रमक झाले.

29 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत 16 नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यावर शासनाकडून मागणीची दखल घेण्यात आली आहे, आंदोलनाचा निर्णय मागे घ्यावा, असे पत्र पठार विकास संस्थेस देण्यात आले. मात्र, काहीच निर्णय न झाल्याने शेतकर्‍यांनी गुरुवार पासून आणे येथे धरणे आंदोलन सुरू केले. 22 नोव्हेंबरपर्यंत साखळी उपोषण व त्यानंतर मागणी पूर्ण होईपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संस्थेचे सचिव विराज शिंदे यांनी दिला आहे.

या वेळी पठार विकास संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकर दाते, पेमदराचे उपसरपंच बाळासाहेब दाते, शिंदेवाडीचे गोरख शिंदे, आणेचे उपसरपंच सुहास आहेर, धनंजय दाते, लक्ष्मण शिंदे, गुलाबराव आहेर यांनी या वेळी मार्गदर्शन केले. शिंदेवाडीचे सरपंच अजित शिंदे, मुक्ता दाते, भास्कर आहेर, गोरख आहेर आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT