पुणे : यंदाच्या मान्सूनवर अल-निनोचे सावट राहण्याची शक्यता दिसत असून, आगामी पावसाळ्याच्या मध्यात खंडाची स्थिती राहू शकते, असा प्राथमिक अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दिला आहे. दरम्यान, यावर बोलणे घाईचे असून घाबरण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया इतर शास्त्रज्ञांनी दिली आहे.
नवे वर्षे २०२६ सुरू होताच हवामानशास्त्राच्या संकेतांनुसार आता ला- निनाचा प्रभाव भारतातून कमकुवत होत आहे. यंदा २०२६ च्या वसंत ऋतूपर्यंत तो तटस्थ स्थितीत राहण्याची शक्यता आहे, असा इशारा स्कायमेटने दिला आहे. यात म्हटले आहे की, जर अल- निनो विकसित झाला तर यंदाच्या मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यांत सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील दोन महिने ला निनाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे.
मार्च २०२६ पर्यंत हवामान 'ईएनएसओ-न्यूट्रल' होईल, असे म्हटले आहे.
हिंदी महासागर द्विध्रुवाचा नकारात्मक टप्पा, जो नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपेक्षित होता, तो डिसेंबर २०२५ दरम्यान कमकुवत होऊन तटस्थ झाला आहे.
त्यामुळे जानेवारी २०२६ मध्ये हा द्विध्रुव तटस्थ राहण्याची शक्यता असून २०२६ च्या वसंत ऋतूमध्येही हीच स्थिती कायम राहू शकते.
मान्सूनवर प्रभाव पाडण्यासाठी एकूण १६ घटक कारणीभूत असतात. त्यापैकी अल-निनो एक घटक आहे. भारतीय मान्सूनबाबतची स्थिती एप्रिलमध्ये अधिक स्पष्ट होते. त्यामुळे यावर इतक्या लवकर भाष्य करणे घाईचे आहे. त्यामुळे या अंदाजावर घाबरून जाण्याचे कारण नाही.- डॉ. माणिकराव खुळे, निवृत्त, हवामान शास्त्रज्ञ