नारायणगाव : तरकारी आणि भाजीपाला पिकांना कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळावे तसेच तणांचे प्रमाण कमी राहावे यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर मल्चिंग पेपरचा वापर करत आहेत. मात्र, पीक काढणीनंतर वापरलेला मल्चिंग पेपर उघड्यावर फेकून दिला जात असल्याने पर्यावरणासह मानव आणि जनावरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जुन्नर तालुक्यातील डिंगोरे, उदापूर, बनकर फाटा, पिंपळगाव जोगा, आळे, पिंपळवंडी, उंब्रज आणि काळवाडी परिसरात टोमॅटो, मिरची, गवार, दोडका, काकडी, ढोबळी मिरची आणि झेंडू आदी पिकांसाठी जमिनीवर मल्चिंग पेपर अंथरून लागवड केली जाते. कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर या पद्धतीचा अवलंब करत आहेत.
एका हंगामानंतर काही प्रमाणात मल्चिंग पेपरचा पुनर्वापर केला जातो. मात्र, पुढील पिकासाठी नवीन पेपर टाकताना जुना पेपर रस्त्याच्या कडेला, ओढे-नद्यांच्या परिसरात किंवा शेताच्या बांधालगत उघड्यावर फेकून दिला जातो. उन्हामुळे या प्लास्टिकचे छोटे तुकडे होतात आणि पावसाळ्यात ते पाण्यात मिसळून वाहून जातात. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे.
तसेच, शेताच्या बांधालगत टाकलेला प्लास्टिक पेपर चाऱ्यासाठी फिरणाऱ्या जनावरांच्या पोटात जात असल्याने भूक मंदावणे, पोटदुखी, दूध उत्पादन घटणे अशा समस्या निर्माण होत आहेत. अनेक वेळा पोटात प्लास्टिक गेल्याने पाळीव जनावरे दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
दरम्यान, मल्चिंग पेपर सध्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असला तरी भविष्यात तो मानव आणि जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी भीती शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्लास्टिकचे सूक्ष्म तुकडे पाण्याद्वारे शरीरात गेल्यास कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
पॉलिथिन पेपरमुळे जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. जनावरांची भूक मंदावते, आरोग्य खालावते आणि काही दिवसांनी जनावरे दगावण्याची शक्यता निर्माण होते. या प्लास्टिकमधील घटकांचा परिणाम मानवी आरोग्यावरही होऊ शकतो. प्लास्टिकचे सूक्ष्म तुकडे पाण्यातून शरीरात गेल्यास कॅन्सरसारख्या आजारांचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे वापरलेला मल्चिंग पेपर गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.- अनिलतात्या मेहेर, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (ता. जुन्नर)